खांब–देवकान्हे–धामणसई विभागातील शेतकरी सिंचन पाण्यासाठी आक्रमक

खांब–देवकान्हे–धामणसई विभागातील शेतकरी सिंचन पाण्यासाठी आक्रमक
कोलाड (श्याम लोखंडे) : 
रोहा तालुक्यातील खांब, देवकान्हे, धामणसई परिसरातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. कुंडलिकेच्या सिंचनातून कोलाड पाटबंधारे विभागाकडून उजवातीर व डावातीर कालव्यांची दुरुस्तीच्या नावाखाली कामे अपूर्ण असून या भागात उन्हाळी भातशेती पाण्याअभावी कोरडी पडत आहे. शेतकरी ग्रामस्थ वारंवार पाण्याची मागणी करत असूनही पाटबंधारे खात्याकडून सतत दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे.
शेतकऱ्यांनी डोळवहाल सिंचनातून उजवा तीर कालव्याला येत्या डिसेंबरपर्यंत पाणी सोडावे, तसेच नोव्हेंबर अखेरपर्यंत कालव्याची उर्वरित दुरुस्ती व गाळ काढणी करण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे. या संदर्भात धामणसई-पिंगलसई भागातील शेतकऱ्यांनी उपअभियंता यांना निवेदन दिले असून खांब परिसरातील तळवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे येथील सर्व शेतकरीही लवकरच सामूहिकरित्या निवेदन देणार आहेत.
तसेच, केंद्र सरकारने जारी केलेल्या वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको सेंसिटिव्ह झोन) हटावाबाबत शेतकरी संघटनात्मक पातळीवर एकत्र आले आहेत. दुबार भातपीक घेण्यासाठी पाण्याचा पुरवठा करण्याच्या मागणीसाठी धानकान्हे येथे नुकतीच सभा झाली असून या बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. या सभेला बहुसंख्य शेतकरी व आदिवासी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *