कोकणात ‘या’ तारखेपासून समुद्रात मासेमारीसाठी बंदी !

Fish2
अलिबाग :
प्रामुख्याने कोकणात सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाचा जोर सुद्धा तितक्याच प्रखरतेने असतो. या कालावधीत वादळी हवामान असल्याने जिवीत व वित्त हानी होण्याची दाट शक्यता असते. त्यापासून मच्छिमारांचे संरक्षण व्हावे या हेतूने यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारीस बंदी घालण्यात येते.
दरम्यान, यंदा १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसे मत्स्यव्यवसाय विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. बंदी काळात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या कालावधीत यांत्रिक नौका मासेमारीस गेल्या असता अपघात झाल्यास त्यासंबंधीची कोणतीही नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार नाही, नौका पुनर्वसनासंबंधीचा प्रस्ताव विचारात घेण्यात येणार नाही, बंदी कालावधीत अपघाताने मच्छिमारांवर मृत्यू ओढवल्यास त्याच्या वारसांना कोणत्याही प्रकारची मदत अथवा अर्थसहाय्य शासनाकडून मंजूर केले जाणार नाही, शासनाच्या कोणत्याही अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही, बंदी कालावधीत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौका मालकांविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *