पोलादपूर ( शैलेश पालकर ) : तालुक्यातील मिनी महाबळेश्वर असलेल्या कुडपणकडे जाणार्या पोलादपूर कुडपण एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात होऊन ५-६ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा अपघात रविवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास क्षेत्रपाळ हद्दीत घडला आहे. दरीकडे गाडी नेण्याऐवजी डोंगराकडील गटारामध्ये गाडी नेऊन थांबविण्याचे प्रयत्न करणार्या चालकाचे कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर ते कुडपण जाणारी एसटी बस परतीच्या प्रवासामध्ये कुडपण ते पोलादपूर अशी येत असताना क्षेत्रपाळ गावाच्या हद्दीत आली असता एसटी बस(एमएच १४ बीटी २७४९)चे ब्रेक फेल झाले.
यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून दरीच्या दिशेने न जाता एसटी बस रस्त्याच्या कडेला घेत गटारामध्ये बस नेत प्रवाशांचे प्राण वाचवले. मात्र, यामध्ये पाच ते सहा प्रवाशांना मुका मार लागून किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.
चालक ए.एस. मांगडे यांनी प्रसंगावधान राखून प्रवाशांना वाचवले. यामुळे प्रवासी व जनतेतून चालक मांगडे यांचे कौतुक होत आहे.