मुरूड तालुक्यातील काशीद ग्रामपंचायतीत मोठी कारवाई करत जिल्हाधिकारी रायगड यांनी सरपंच संतोष राणे, उपसरपंच सुमित रमेश कासार आणि ग्रामपंचायत सदस्य दीपेश दत्तात्रेय काते यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. शासकीय जागेवरील अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकाम आणि दस्तऐवजांचा गैरवापर यासंबंधीच्या गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय देण्यात आल्याने काशीद परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ही तक्रार काशीद येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. रोहन रमण खोपकर यांनी रीतसर पुराव्यासह दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर झालेल्या सुनावणीदरम्यान सर्व बाजूंचे सविस्तर युक्तिवाद ऐकून जिल्हाधिकाऱ्यांनी तिन्ही पदाधिकारी दोषी ठरवत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले.
अॅड. खोपकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच संतोष राणे यांनी महाराष्ट्र शासनाच्या मालकीची जागा बेकायदेशीररीत्या नोटरी करून विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. ही जागा शासन नावे असूनही त्यावर १२ लाख रुपयांचा व्यवहार करण्यात आल्याचे दस्तऐवजांतून स्पष्ट झाले.
उपसरपंच सुमित कासार यांनी काशीदच्या समुद्रकिनाऱ्यावर अतिक्रमण करून अनाधिकृत स्टॉल उभारला, तर सदस्य दीपेश काते यांनी सरकारी जमिनीवर त्यांच्या आईच्या नावाने स्टॉल बांधल्याचे तपासात आढळून आले.
या तिन्ही गैरप्रकारांसंदर्भात डिसेंबर २०२३ आणि ४ एप्रिल २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली. पुरावे, प्रतिज्ञापत्रे व दस्तऐवजांवर आधारित युक्तिवादानंतर जिल्हाधिकारी यांनी कठोर निर्णय घेत तिन्ही पदाधिकारी पदच्युत केले.
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अंतिम सुनावणीत हा आदेश देण्यात आला. अर्जदार खोपकर यांच्या वतीने अॅड. परेश देशमुख यांनी सुनावणीदरम्यान सर्व कागदपत्रे आणि पुरावे मांडले. त्यांनी दिलेले तथ्याधारित युक्तिवाद जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य करत तिन्ही पदांच्या रद्द करण्यास मंजुरी दिली.
सर्व्हे नंबर 28/2 या 84 गुंठे शासकीय जागेत सरपंच राणे यांनी 121.28 चौ. मी. क्षेत्रफळाचे घर बांधल्याचे, तसेच 2020 मध्ये ते आपल्या नावावर करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. हे सर्व प्रकरण खोपकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित तक्रार दाखल केली.
निर्णयानंतर अॅड. रोहन खोपकर यांनी सांगितले, “हा निर्णय न्याय्य असून प्रशासनाने योग्य कृती केली. मी जिल्हाधिकारी आणि न्यायदेवतेचे आभार मानतो.”
काशीद ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य अशी तीनही प्रमुख पदे एकाचवेळी रिक्त झाल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या निर्णयाची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.
अॅड. परेश देशमुख आणि रोहन खोपकर यांच्या या लढ्याचे शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अभिनंदन करत स्वागत केले आहे.