
कर्जत ग्रामीण | मोतीराम पादीर
कर्जत–मुरबाड–शहापूर राज्य महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम मागील चार वर्षांपासून सुरू असले तरी अनेक ठिकाणी अपूर्ण कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने दररोज अपघात घडत असून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः राज्य महामार्ग बाजारपेठेतून जात असल्याने कडाव–कशेळे बाजार परिसरात रस्त्यावर खड्डे आणि उडणाऱ्या धुळीमुळे व्यापारी व नागरिक त्रस्त झाले आहेत.
राज्य मार्गावरील कडाव येथील पेज नदीवरील पूल, वंजारवाडी फाटा, कशेळे बाजारपेठ, नालधे गावाजवळ तसेच कळंब पोलीस स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या संदर्भात कशेळे ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई येथे प्रत्यक्ष भेट देऊन तक्रार केली होती. दोन दिवसांत खड्डे भरण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही.
दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लोकमित्र रमेश हिंदुराव यांनी ८ फेब्रुवारी रोजी या रस्त्यावरून प्रवास करताना परिस्थितीचा अनुभव घेतल्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना निवेदन दिले आहे. आठ दिवसांत खड्डे न भरल्यास कशेळे परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, रायगड जिल्हाधिकारी, कर्जत तहसीलदार आणि कर्जत पोलीस ठाण्यास देण्यात आल्या आहेत. याबाबत उदय पाटील, सचीन राणे, राजेंद्र हारपुडे, दिनेश हारपुडे आणि विजय शिंदे या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन व्यापारी वर्गालाही माहिती देण्यात येत आहे.
Related