अनैतिक संबंधांच्या संशयातून मित्राचाच निर्घृण खून करून मृतदेह तब्बल १९१ किलोमीटर अंतरावर नेऊन जाळून विहिरीत टाकण्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात नवी मुंबई पोलिस दलातील हवालदारच मुख्य आरोपी असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, सातारा स्थानिक गुन्हे शाखा व लोणंद पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत खाकीतील गुन्हेगारासह चार आरोपींना अटक करत या हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे.
६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे सुखेड, ता. खंडाळा येथील चोपडे वस्ती परिसरातील एका शेतविहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेतील, हातपाय बांधलेला अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था संशयास्पद असल्याने याबाबत लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मयत रजिस्टर नंबर ०९/२०२६, भा.ना.सु.सं.क. १९४ अन्वये नोंद करण्यात आली होती.
पोलिस तपासात मृताची ओळख सोमनाथ कल्याण बोबडे (रा. सेक्टर २०, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड) अशी पटली. मृतदेहाचे पाय बांधलेले आणि शरीर जळालेल्या अवस्थेत आढळल्याने हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखा व लोणंद पोलिसांची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
घटनास्थळ परिसरातील साक्षीदार, तसेच ये-जा करणाऱ्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस एका संशयित होंडा सिटी कारपर्यंत पोहोचले. या कारच्या हालचाली कळंबोली परिसरात आढळून आल्याने तपासाची दिशा निश्चित झाली. तपासात मुख्य आरोपी बंडू बापू भिसे (वय ४९ वर्षे, रा. के.एल. ५ बिल्डिंग नं. १५, रूम नं. १६, सेक्टर ३ ई, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड; मूळ रा. दुधेबावी, ता. फलटण, जि. सातारा) हा रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत हवालदार असल्याचे निष्पन्न झाले. भिसे याला त्याचा मित्र सोमनाथ बोबडे याचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातूनच ५ फेब्रुवारी रोजी भिसेने आपल्या साथीदारांच्या मदतीने सोमनाथला भेटीसाठी बोलावले. त्यानंतर कळंबोली येथे त्याचे हातपाय बांधून गळा आवळत निर्घृण खून करण्यात आला. या गुन्ह्यात विजय पोपटराव पवार (वय ३६, रा. साखरवाडी मार्कड मळा, ता. फलटण, जि. सातारा), किरण विकास गायकवाड (वय २७, मूळ रा. होळ, ता. फलटण, जि. सातारा; हल्ली रा. पंचम सोसायटी, पारी चौक, पुणे) आणि श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे (वय २५, रा. चुरमापुरी, ता. अंबड, जि. जालना; हल्ली रा. धायरीश्वर संकुल, रायकर मळा, धायरी, पुणे) हे तिघे सहभागी होते.
हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह होंडा सिटी कारमध्ये ठेवून आरोपींनी तब्बल १९१ किलोमीटरचा प्रवास केला. सुखेड येथे मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून देत तो शेतविहिरीत टाकण्यात आला. अटकेनंतर सुरुवातीला मुख्य आरोपीने गुन्ह्याची कबुली देण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आणला. सर्व चार आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास लोणंद पोलीस ठाणे करत आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण तपासामुळे हा अत्यंत संवेदनशील गुन्हा अवघ्या ७२ तासांत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.