कर्जत–मुरबाड महामार्गावरील कळंब–चाहूचीवाडी परिसरात बुधवारी (१५ जुलै) रात्री झालेल्या भीषण अपघातात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस जवान ऋतिक किसन ढोले (वय २६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अन्य चार जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
कळंब येथून आपल्या चार मित्रांसह इको कारमधून चाहूचीवाडी येथील घरी जात असताना गावाजवळील धोकादायक वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी संरक्षक रेलिंगवर आदळली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच कळंब पोलीस चौकीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना बाहेर काढून भिवपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गंभीर जखमी झालेल्या ऋतिक ढोले यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर अन्य चार जखमींपैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी एका जखमीला पुढील उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताचा पुढील तपास नेरळ पोलीस करीत आहेत.
ऋतिक ढोले हे वडिलांच्या निधनानंतर सुमारे दोन वर्षांपूर्वी अनुकंपा तत्त्वावर महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाले होते आणि सध्या श्रीवर्धन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नुकतेच त्यांचा विवाह झाला होता, तसेच त्यांची पत्नी गरोदर असल्याने या दुर्दैवी घटनेमुळे ढोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण पोलीस जवानाच्या अकाली निधनाने पोलीस दलासह संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.