कर्जतमध्ये ड्रग्स तस्करीचा भांडाफोड; अमलीपदार्थासह नायजेरियन नागरिक जेरबंद

कर्जतमध्ये ड्रग्स तस्करीचा भांडाफोड
कर्जत | गणेश पवार
कर्जत तालुक्यात अमलीपदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून, पुणे पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिसांनी संयुक्तपणे हलिवली येथील सिग्नेचर डिझायर इमारतीवर धाड टाकली. या कारवाईत काही नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून, फ्लॅटमधून अमलीपदार्थ तसेच तस्करीशी संबंधित महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हलिवली येथील सिग्नेचर डिझायर इमारतीच्या बी विंगमधील फ्लॅट क्रमांक १०२ येथे वास्तव्यास असलेल्या काही नायजेरियन नागरिकांकडून अमलीपदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पुणे पोलिसांचे अमलीपदार्थ विरोधी पथक आणि कर्जत पोलिसांनी संयुक्तपणे फ्लॅटवर छापा टाकला. कारवाईदरम्यान संबंधित फ्लॅटची कसून झडती घेण्यात आली. त्यावेळी अमलीपदार्थांसह तस्करीच्या व्यवहाराशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात काही नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यासोबत एका स्थानिक तरुणाचीही कसून चौकशी सुरू असल्याचे समजते.
प्राथमिक तपासात अमलीपदार्थ तस्करीच्या नेटवर्कशी संबंधित काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती केवळ कर्जत तालुक्यापुरती मर्यादित आहे की त्यामागे मोठे आंतरराज्य अथवा व्यापक तस्करीचे नेटवर्क कार्यरत आहे, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. या धाडीनंतर हलिवलीसह संपूर्ण कर्जत परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या अमलीपदार्थांचे नेमके वजन, त्यांचे बाजारमूल्य, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची अधिकृत संख्या तसेच तस्करीच्या नेटवर्कची संपूर्ण व्याप्ती याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांकडून अधिकृतरीत्या जाहीर होणे अपेक्षित आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलिसांचे अमलीपदार्थ विरोधी पथक आणि कर्जत पोलीस संयुक्तपणे करीत असून, तपासातून आणखी महत्त्वाची माहिती आणि या तस्करीच्या साखळीतील इतर धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.