
उरण (विठ्ठल ममताबादे) :
दिनांक ८ जुलै रोजी अलिबाग येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) आयुक्त अनिलकुमार गायकवाड यांच्या उपस्थितीत करंजा-रेवस पुलाच्या कामामुळे प्रभावित झालेल्या शेतकरीवर्ग आणि मच्छिमार बांधवांच्या समस्या व मोबदल्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक अलिबाग-मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पुढाकारातून झाली.
पुलाच्या कामामुळे स्थानिक मच्छिमार आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना न्याय मिळावा यासाठी चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच अजय म्हात्रे, माजी सभापती सागर कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम नाखवा, सामाजिक कार्यकर्ते सचिन रमेश डाऊर, कुंदन नाखवा आदी प्रतिनिधींनी आमदार महेंद्रशेठ दळवी यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. त्यांनी या समस्येवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली.
या बैठकीनंतर आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थितांना आश्वासन दिले की, येत्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत नुकसानभरपाई, मोबदला आणि स्थानिकांच्या इतर मागण्यांवर निर्णय होईल, असे ते म्हणाले.