अलिबाग-रेवदंडा रस्त्याची दयनीय अवस्था; खड्डे बुजवण्यासाठी स्लॅगचा वापर, वाहनचालक संतप्त

Alibag revdanda road
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
अलिबाग-रेवदंडा मार्गावरील खड्ड्यांनी प्रवाशांचे जीव टांगणीला लागले असतानाही, रस्त्याची डागडुजी करताना रेडिमिक्स डांबराऐवजी जेएसडब्ल्यूच्या स्लॅगचा वापर करण्यात येत आहे. एमएसआरडीसीचा हा ‘जावईशोध’ सध्या वाहनचालकांच्या संतापाचा विषय ठरतोय.
अलिबाग-रेवदंडा हा रस्ता नागाव, काशीद, मुरुड आदी पर्यटनस्थळांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असून, मोठ्या प्रमाणात अवजड वाहनेही चालतात. परंतु, पावसाळ्यापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, चार-पाच फूट लांब आणि दोन फूट खोल खड्डे रस्त्याच्या प्रत्येक टप्प्यावर आढळतात. काही ठिकाणी मोठे दगड टाकून केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे, त्यामुळे दुचाकीस्वार व पादचारी घसरून अपघातग्रस्त होत आहेत.
एमएसआरडीसीकडून या रस्त्यांची देखभाल केली जाते. मात्र, सध्या जेएसडब्ल्यू उद्योगसमूहाकडून बाहेर टाकण्यात येणाऱ्या औद्योगिक ‘स्लॅग’चा वापर करून खड्डे बुजवले जात आहेत. हे स्लॅग दीर्घकाळ टिकत नाहीत आणि पावसामुळे लगेच उखडतात. वाहनचालक, स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांच्यातून यावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रेडिमिक्स डांबराचा वापर करून रस्त्यांचे मजबुतीकरण व्हावे, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
या मार्गावरील खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात रोज घडत असून, वाहतूक कोंडीही वाढली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांची अवस्था गावरस्त्यासारखी झाली असून, ‘निकृष्ट दर्जा’ हीच रस्त्यांची ओळख बनली आहे. स्थानिक नागरिकांनी एमएसआरडीसीच्या कामकाजाची सखोल चौकशी व्हावी आणि दर्जेदार रस्ते बनवावेत, अशी मागणी केली आहे.
==========================
दिवसभरात येथील खड्डे तात्काळ सिमेंट काँक्रिटने भरण्यात येतील. वाहनचालकांचा जीव महत्वाचा आहे. त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.
…बसवंत सिंग, कार्यकारी अभियंता, msrdc

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *