तालुक्यातील सुंदरराव मोरे महाविद्यालयातील एका तरूणीला आडरस्त्यावर बोलावून तिच्या शरिरावर निर्घृणपणे चाकूचे सपासप वार करून तिला रक्ताच्या थारोळयात टाकून आरोपी पसार झालेल्या शुभम वनारसे याला माणगाव सत्र न्यायालयाने 6 वर्षे 7 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. गल्लीबोळात मोबाईलवरून प्रेमाच्या आणाभाका घेत आडोसा गाठणारी तरूणाई या निकालानंतर स्तब्ध झाल्याचे दिसून येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील दत्तवाडी कातळी येथील रहिवासी असलेल्या शुभम वनारसे या 21 वर्षीय माथेफिरू तरूणाने अनेक तरूणींना नादी लावले. शुभमच्या बोलण्यावागण्याने प्रभावित झाल्यानंतर पोलादपूर सावंतकोंड येथील समर्थनगरच्या निर्जन रस्त्यावर शिवाजी चौक तुर्भे बुद्रुक येथे आईसोबत राहणारी पिडीत मुलगी कॉलेज सुटल्यानंतर एका मैत्रिणीसोबत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गापासून 500 ते 700मीटर अंतरावर आत गेली. यानंतर तिची मैत्रीण काही अंतरावर असताना आरोपी शुभम वनारसे याने पिडीत मुलीच्या हातावर, खांद्यावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून कसलेसे अज्ञात शस्त्र तिच्या पाठीमध्ये घुसवले. यामुळे ती मुलगी रस्त्यालगतच्या गवतावर रक्ताच्या थारोळयात जखमी व बेशुध्द अवस्थेत पडली होती. यानंतर सोबतच्या मुलीने आरडाओरड केल्याने काहींनी तातडीने पोलीसांना घटनास्थळी पाचारण केले. मात्र, या गदारोळात तो माथेफिरू तरूण त्या जखमी तरूणीला तेथेच टाकून पसार झाला.
पोलादपूरचे तत्कालीन सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव आणि पोलीस नाईक वार्डे, शेख, नटे आणि अन्य सहकाऱ्यांनी यावेळी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमी तरूणीला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल केले. डॉ.राजेश सलागरे यांनी तातडीने तिच्यावर प्रथमोपचार करून तिच्या पाठीत खुपसलेले हत्यार काढण्यासाठी पुढील उपचार करण्यास महाड येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये पाठविले. घटनास्थळी सदर माथेफिरू तरूणाचा एक मोबाईल काहींना आढळून आल्यानंतर तो पोलीसांना देण्यात आला. यानंतर पोलीसांनी तीन पथकं फरारी आरोपी शुभम वनारसे याच्या मागावर लावली.
या घटनेपूर्वी आरोपी शुभम वनारसे याचे यापुर्वी धामणदिवीतील एका शाळकरी मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे उघड होताच त्याला तिच्या कुटूंबियांनी प्रेमसंबंधाना विरोध केल्यानंतर आरोपीने तिच्या गुरांचा वाडा पेटवून दिल्याची माहिती चर्चेत आली. आरोपी शुभम वनारसे याने पोलादपूर शहरातील आरओ पाणी सप्लायच्या व्यवसायामध्ये पाण्याचे जार वाटण्याची नोकरी केली असता अनेकांनी त्याच्या गैरवर्तनावरून त्याला प्रसाद दिल्याचीही चर्चा सुरू झाली.
फरार शुभमला छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळयाजवळ पोलीसांनी केले जेरबंद
पोलादपूर पोलीस महाडच्या दिशेने शुभम वनारसे याच्या मागावर निघाले असताना काही खबरींनी एका तरूणाने मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरून पैसे न देताच पेट्रोलपंपातून पलायन केल्याची माहिती पोलादपूर पोलीसांना दिली आणि त्याचवेळी हडकुळा व उंच असलेला एक मोटारसायकलस्वार पोलीसांच्या खासगी कारच्या बाजूच्या चौपदरीकरण रस्त्यावरून सुस्साट वेगाने जात असल्याचे दिसून आले. यावेळी सदर मोटारसायकलस्वार शुभमच असल्याची खात्री शेख यांना पटल्याने त्यांनी पोलादपूर वाहतूक पोलीस विश्राम गुंजाळ आणि राज पवार यांना नाकाबंदी करण्यास सांगितले. पोलीस नाईक दीपक जाधव यांनी खासगी कार तातडीने परत पोलादपूरच्या दिशेने शुभमचा पाठलाग सुरू केला. पोलादपूरपर्यंत शुभम वनारसे याने तब्बल 70-80 कि.मी.प्रतितास या वेगाने मोटारसायकल चालवित शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळयाजवळील वाहतूक पोलीस गुंजाळ आणि राज पवार यांनी लावलेले बॅरेकेटस् पार करून जाण्यासाठी मोटारसायकलचा वेग कमी केला असता वाहतूक पोलीस राज पवार यांनी शुभमच्या मोटारसायकलीचे हॅण्डल ओढल्याने तो धडपडला. पाठोपाठ पोलादपूरचे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव गुप्तवार्ता पोलीस नाईक इकबाल शेख, पोलीस नाईक दीपक जाधव हे तिघे खासगी कारने शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळयाजवळ पोहाचले आणि त्यांनी शुभम वनारसे याला पोलीसी खाक्या दाखवित जेरबंद करून पोलीस ठाण्यात नेले.
शुभम वनारसे याला अखेर सक्तमजूरीची शिक्षा
आरोपी शुभम वनारसे याच्याविरूध्द भा.दं.वि.स. कलम 307,392,354,354, (ड) (1) (1), 504,506 सह पोक्सो कलम 9,10 अन्वये पोलादपूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला. या गुन्हयाचा तपास पोलादपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी करून मा. अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी माणगांव येथे मा. अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये झाली. सदर खटल्यामध्ये अतिरिक्त शासकिय अभियोक्ता योगेश तेंडूलकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. खटल्यात फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व वैद्यकिय अधिकारी, तपासी अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. या खटल्यामधील आरोपी शुभम गजानन वनारसे यास मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांनी दि. 16 मार्च 2026 रोजी दोषी ठरवून आरोपीस भा.द.वि.क. 307 अन्वये व पोक्सो कलम 9,10 अन्वये 6 वर्ष 7 महिने सक्तमजूरी व 8 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याच्या कामकाजात पैरवी अधिकारी व पोलिस कर्मचारी यांचे महत्वाचे सहकार्य लाभले.