पेण पोलिसांची उत्तम कामगिरी ! स्कुटी चोरीचा उलगडा; नागोठण्यातील आरोपी जेरबंद, दोन दुचाकी जप्त

PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
पेण शहरातील भाजी मंडई परिसरातून चोरीला गेलेल्या अॅक्टीव्हा स्कुटी प्रकरणाचा पेण पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत उलगडा केला आहे. या प्रकरणात नागोठणे येथील एका आरोपीला अटक करून सुमारे ४५ हजार रुपये किमतीच्या दोन स्कुटी जप्त करण्यात आल्या आहेत.
पेण भाजी मंडईतील निधी ट्रेडर्स दुकानासमोर उभी असलेली लाल रंगाची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा (एमएच-०६/सीबी-१०८४) ही स्कुटी ९ मार्च २०२६ रोजी दुपारी साडे दोन ते पावणे तीनच्या सुमारास अज्ञात इसमाने चोरी करून नेली. या प्रकरणी संतोषी माता मंदिराजवळ, तांबडशेत (पो. जोहे, ता. पेण) येथील रहिवासी राजाराम धर्मा म्हात्रे (वय ५४) यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाने सुरू केला. घटनास्थळी सीसीटीव्ही उपलब्ध नसतानाही पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील तसेच पेण ते नागोठणे मार्गावरील सुमारे २५ ते ३० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला. गोपनीय माहितीच्या आधारे नागोठणे येथील राजेंद्र नथुराम किळंज उर्फ अबू (वय ४२, रा. मराठा आळी, नागोठणे, ता. रोहा) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्कुटी चोरी केल्याची कबुली दिली. त्याला १३ मार्च २०२६ रोजी अटक करण्यात आली.
तपासादरम्यान पेण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी एका स्कुटी चोरी प्रकरणाचाही उलगडा झाला. आरोपीकडून सुमारे २० हजार रुपये किमतीची लाल रंगाची अॅक्टीव्हा (एमएच-०६/सीबी-१०८४) आणि २५ हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची टीव्हीएस ज्युपिटर (एमएच-०६/सीके-७४४२) अशा एकूण ४५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सुनिल चव्हाण, राजेश पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली.