महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयावरून ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन संशयितांना अटक केली असून, टीईटीची प्रश्नपत्रिका तब्बल दीड कोटी रुपयांना विकण्याचा कट उधळून लावल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी दिली. या घटनेमुळे राज्यातील सुमारे ४ लाख २८ हजार उमेदवारांवर मोठा परिणाम झाला असून परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ जून २०२६ रोजी राज्यातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा MAHA- TET आयोजित करण्यात आली होती. मात्र परीक्षा होण्याच्या काही तासांपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्याने परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. भिवंडी पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर करण्यात आलेल्या कारवाईत तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणात मोठ्या पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भिवंडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक आरोपी हरियाणाचा तर दोन आरोपी बिहारचे रहिवासी आहेत. हे तिघेही दिल्लीहून महाराष्ट्रात आले होते. प्राथमिक तपासात त्यांनी टीईटीची प्रश्नपत्रिका तब्बल दीड कोटी रुपयांना विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले असून, व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटक केली. संशयितांकडून प्रश्नपत्रिकेशी संबंधित कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे.
प्रश्नपत्रिका नेमकी कुठून मिळाली, ती आरोपींपर्यंत कशी पोहोचली, कोणाला विकली जाणार होती आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. यासाठी २० पोलिस कर्मचाऱ्यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून विविध राज्यांमध्ये तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, भिवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संशयितांकडील मजकुराची पडताळणी केली असता तो टीईटीच्या मूळ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांशी जुळत असल्याचे आढळून आले. परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी २८ जूनची शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
नीट परीक्षेतील गैरप्रकारानंतर यंदा टीईटीसाठी विशेष सुरक्षा उपाययोजना केल्याचा दावा परीक्षा परिषदेने केला होता. मात्र तरीही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयामुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे ४ लाख २८ हजार उमेदवार बसणार होते. परीक्षा पुढे ढकलल्याने लाखो उमेदवारांच्या नियोजनावर परिणाम झाला असून शिक्षक भरती प्रक्रियेलाही फटका बसण्याची शक्यता आहे.
टीईटी परीक्षेची पुढील तारीख आणि इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला असून येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.