मदिनाहून हैदराबादकडे निघालेल्या इंडिगो विमानात उड्डाणादरम्यान बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. विमानात १८० प्रवासी व सहा क्रू मेंबर्स होते. धमकी मिळताच विमानातून एअर ट्रॅफिक कंट्रोलला संदेश पाठवण्यात आला आणि तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या.
एटीसीकडून सावधगिरीचा उपाय म्हणून विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले व तेथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. उतरल्यावर सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि विमानाची तपासणी सुरू झाली. विमानतळ सुरक्षा संस्था, बॉम्ब निकामी पथक आणि सीआयएसएफच्या टीमने संयुक्तरीत्या विमानाचा शोधनिदान केला.
बॉम्ब धमकी दिलेल्या प्रवाशाला ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सुरू आहे. या धमकीमागे मानसिक अस्थिरता आहे की काही वेगळा हेतू, याबाबत अहमदाबाद पोलिस चौकशी करत आहेत. सुदैवाने तपासणीदरम्यान विमानात आतापर्यंत कोणतेही संशयास्पद साहित्य सापडलेले नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.