४ ते ७ डिसेंबरदरम्यान मोठी भरती – समुद्रात उसळणार धोकादायक लाटा

Samudra
मुंबई | विशेष प्रतिनिधी 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा इशारा दिला आहे. सलग चार दिवस समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या आणि काही वेळा ५ मीटरपेक्षाही मोठ्या लाटा उसळणार आहेत. यामध्ये ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२:३९ वाजता तब्बल ५.०३ मीटर उंचीच्या लाटा येणार असल्याची नोंद आहे.
भरतीच्या या दिवसांत नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांच्या परिसरात जाणं टाळावं, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. उच्च भरतीदरम्यान तसेच त्याआधी–नंतरच्या काळात समुद्रकिनारे, खडकाळ भाग, जेट्टी व बोटिंग क्षेत्रांपासून लांब राहण्याचे निर्देश दिले आहेत. अनावश्यक धाडस टाळण्याबरोबरच सेल्फी घेणे किंवा समुद्रात उतरणे हे धोकादायक ठरू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
महानगरपालिका आणि मुंबई पोलिस वेळोवेळी सूचना आणि सतर्कता संदेश देणार असून त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन स्थिती, पाण्याचा जोर वाढणे किंवा समुद्र किनाऱ्यावर अडकल्यास तात्काळ १९९ किंवा १०० वर संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. ४, ५, ६ आणि ७ डिसेंबर रोजी नागरिकांनी अत्यंत सावधानता बाळगण्याचे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे.
४ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या भरतीचे वेळापत्रक… 
१. गुरुवार, ४ डिसेंबर – रात्री – ११:५२ वा.- लाटांची उंची – ४.९६ मीटर
२. शुक्रवार, ५ डिसेंबर –  सकाळी – ११:३० वा.- लाटांची उंची – ४.१४ मीटर
३. शनिवार, ६ डिसेंबर – मध्यरात्री – १२:३९ वा.-लाटांची उंची – ५.०३ मीटर
४. शनिवार, ६ डिसेंबर – दुपारी – १२.२० वा.- लाटांची उंची – ४.१७ मीटर
५. रविवार, ७ डिसेंबर – मध्यरात्री – ०१.२७ वा. लाटांची उंची – ५.०१ मीटर
६. रविवार, ७ डिसेंबर – दुपारी – ०१.१० वा. लाटांची उंची  – ४.१५ मीटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *