आरएफ सिग्नलवर बसचालकाला अचानक रक्ताच्या उलट्या; पोलिसांच्या तत्परतेने रुग्णालयात दाखल

पनवेल | संजय कदम 
 तळोजा फेज-२ ते खारघर स्टेशन या मार्गावर एनएमएमटी बस चालवित असताना चालकाला आरएफ सिग्नलजवळ अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याची घटना घडली. पोलिसांच्या तत्परतेमुळे चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आरएफ सिग्नल येथे पो. हवा. गाढवे आणि पो. शि. आव्हाड ड्युटीवर असताना एनएमएमटी बस क्रमांक MH 43 CK 3876 तेथे आली. बसचे चालक रघुनाथ काटे (वय 35, रा. कळंबोली) यांना अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने पोलिसांनी त्यांना बसमधून खाली उतरवले.
पो. हवा. गाढवे यांनी तत्काळ रिक्षाने रघुनाथ काटे यांना तळोजा फेज-२ येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, बसचे वाहक विनोद खंदारे यांनी काटे यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून पुढील उपचार सुरू आहेत.