आदिवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या वतीने भव्य ‘आदिवासी विकास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. शनिवार, दिनांक 7 मार्च 2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 या वेळेत सौभाग्य इन हॉल, आंबेघर, पेण-खोपोली रोड, पेण, जि. रायगड येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या परिषदेमध्ये आदिवासी आदर्श संस्कृती व गौरवशाली इतिहासाचा गौरव करण्यात येणार असून विविध मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमादरम्यान विविध शासकीय योजना, शैक्षणिक सुविधा, व्यवसाय प्रशिक्षण, स्वावलंबन उपक्रम तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली जाणार आहे.
यासोबतच आदिम जमातीतील कातकरी समाजाच्या विविध संस्कृती, पूजाअर्चा, परंपरा यांचे प्रात्यक्षिक सादर करून कातकरी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागाने समाजातील सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत परंपरा पोहोचवण्यासाठी या परिषदेचे नियोजन केले आहे.
सदर कार्यक्रमास आदिवासी समाजातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन प्रकल्प कार्यालय, पेण यांच्यामार्फत करण्यात आले आहे.