पेणमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश; दोन गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल जप्त

PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
पेण तालुक्यातील दोन घरफोडी चोरीच्या घटनांची उकल करण्यात पेण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. या कारवाईत आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दुसर्‍या  गुन्ह्यातील तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुमारे ३ लाख ४५ हजार रुपयांचा चोरीचा माल हस्तगत केला आहे. 
प्राप्त माहितीनुसार, पहिली घटना पेण शहरातील मँगो होम्स सोसायटीमध्ये घडली होती. येथील रहिवासी विकास विठोबा खामदेकर यांच्या घरी १५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते १६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्या-चांदीचे सुमारे १ लाख ९५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतानाही पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित सुमित संतोष हंकारे याच्या हालचालींवर सुमारे ३५ ते ४० दिवस नजर ठेवून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी सांगली जिल्ह्यातून चोरीस गेलेले सर्व सोने-चांदीचे दागिने जप्त केले.

दुसरी घटना पाटणोली, कोप्रोली (ता. पेण) येथे घडली होती. फिर्यादी दिनेश मणीराम म्हात्रे यांच्या भावाच्या घराचा कडी-कोयंडा तोडून २० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८ ते २१ फेब्रुवारी सकाळी ६ या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केली होती. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडी येथे छापा टाकून आरोपी शमसूद्दहा रईस कुरेशी (वय ३६) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत सलीम उर्फ अहमद फिरोज अन्सारी (वय ३०) आणि मोहम्मद शाहिद अल्लाउद्दीन खान हे साथीदार असल्याचे समोर आले. त्यानंतर सलीम अन्सारी याला मुंब्रा येथून अटक करण्यात आली. या दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी, हत्यार आणि चोरीस गेलेल्या रकमेपैकी काही रक्कम जप्त करण्यात आली असून मुख्य आरोपी मोहम्मद शाहिद खान हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या दोन्ही गुन्ह्यांची उकल पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. पुढील तपास सुरू असून फरार आरोपीला लवकरच अटक करून उर्वरित रक्कम जप्त करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.