कर्जत तालुक्यातील शेवटचे ठोक असलेले गाव एनाचिवाडी या आदिवासी व दुर्गम भागातील नयन विठ्ठल वाघ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत आदिवासी प्रवर्गातून पंधरावा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे पेण प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी घरी जाऊन नयन वाघ यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शासकीय सेवेत अधिक यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नयन वाघ यांनी कठीण परिस्थितीत मर्यादित साधनसंपत्ती, कुटुंबाची गरीब परिस्थिती असताना देखील अथक परिश्रम घेऊन हे यश मिळवले आहे. त्यांच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशामुळे आदिवासी भागातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे. त्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण येथील प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे,आश्रम शाळा पिंगळसचे मुख्याध्यापक रमेश चव्हाण, चाफेवाडी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक महेश पाटील, तसेच कळंब येथील लक्ष्मण भिसे व केंद्रप्रमुख पालवे यांनी एनाचीवाडी येथे जाऊन नयन विठ्ठल वाघ यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सर्व मान्यवरांनी वाघ यांचे अभिनंदन करत पुढील शासकीय सेवेत अधिक यशस्वी वाटचाल होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आदिवासी भागातून अशा प्रकारे राज्यसेवा परीक्षेत यश संपादन करणे हे दुर्मिळ आणि प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.