आगरी कोळी बांधवांसह राज्यभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या एकविरा आईच्या मंदिरात ७ जुलै २०२५ पासून नवीन ड्रेस कोड लागू केला जाणार आहे. अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय कार्ला एकविरा आई ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने घेतला असून, या निर्णयाची माहिती ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.
शुक्रवारी पार पडलेल्या ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. यामध्ये मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीने शॉर्ट, मिनी स्कर्ट, फाटकी जीन्स, हाफ पँट यांसारख्या आधुनिक व अंगप्रदर्शन करणाऱ्या वेशभूषेला बंदी घालण्यात आली आहे.
ड्रेस कोडनुसार महिला भक्तांनी साडी, सलवार-कुर्ता किंवा पूर्ण शरीर झाकणारे पारंपरिक कपडे परिधान करणे अपेक्षित आहे, तर पुरुषांनी धोतर, कुर्ता-पायजमा, पँट-शर्ट किंवा टी-शर्टसारखे सुसंस्कृत कपडे वापरणे अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे, मंदिरातील कर्मचाऱ्यांनी भक्तांशी शिष्टाचाराने वागावे, त्यांच्यावर आरडा ओरड करू नये, अशा सूचनाही ट्रस्टने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. भक्तांनीही नियमांचे पालन करून शांततामय वातावरणात देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन खासदार बाळ्या मामा यांनी केले आहे.