अलिबागमध्ये हजारो रुपये किमतीचा गुटखा व मद्यसाठा जप्त; दोन आरोपी जेरबंद

अलिबागमध्ये हजारो रुपये किमतीचा गुटखा व मद्यसाठा जप्त; दोन आरोपी जेरबंद
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरातील शिवलकर नाका येथे मोठ्या प्रमाणात गुटखा, देशी-विदेशी मद्य व भांगेच्या गोळ्यांची जप्ती करण्यात आली आहे. या कारवाईत जयप्रकाश संपत पटेल (वय ४२, रा. रामवाडी, ता. पेण, मूळ रा. रारजिगवा, मध्यप्रदेश) आणि यश रुपेश नागवेकर (रा. शिवलकर नाका, कोळीवाडा, अलिबाग) यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अलिबाग पोलिसांनी २८ जून २०२५ रोजी पहाटे केली.
पोलिस हवालदार अतुल तुकाराम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग शहरात नाकाबंदी सुरू असताना सकाळी सहाच्या सुमारास संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीला थांबवून चौकशी केली असता त्याच्या बॅगेतून प्रतिबंधित विमल गुटख्याचे दोन पाकिटे आढळून आली. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने गुटखा पुरवठ्याची कबुली दिली.
त्यानुसार पोलिसांनी दुसऱ्या आरोपी यश नागवेकर याच्या घरी छापा मारून सुमारे ₹68,049.50 किमतीचा गुटखा, देशी-विदेशी दारू आणि बियर जप्त केली. तसेच जयप्रकाशकडे सापडलेल्या बॅगमध्ये ₹10,940 किमतीचा मुद्देमाल आढळून आला.
दोघांनाही अलिबाग न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक सरिता मुसळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *