सार्वजनिक विहिरीत विषारी औषध टाकणार्‍या माथेफिरु तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Veehir
सुकेळी ( दिनेश ठमके) :
नागोठण्याजवळील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील वेताळवाडी या आदिवासी वाडीतील सार्वजनिक विहिरीत कीटकनाशक औषध टाकण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार दिनांक २६ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे. विहिरीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो हे माहीत असूनही हे कृत्य करणाऱ्या नरेश नामदेव शिद या ३० वर्षीय माथेफिरू तरुणाला नागोठणे पोलिसांनी अटक केले आहे. विहिरीत विषारी औषध टाकून नागरिकांच्या आरोग्यास व पर्यावरणास धोका निर्माण करणाऱ्या या आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता, पाणी प्रदूषण प्रतिबंधक अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत विविध कलमांखाली नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार, सुमारे ५० घरांची वस्ती असलेल्या वेताळवाडी येथील या सार्वजनिक विहिरीतील पाण्याचा वापर वाडीतील सर्व नागरिकांतून पिण्यासाठी करण्यात येतो. शुक्रवार दिनांक २७ जून रोजी वाडीतील महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेल्या असता विहिरीतील पाण्यात तवंग आल्यासारखे दिसल्याने त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.
पाण्यात कुणीतरी कीटकनाशक विषारी औषध टाकल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लगेचच विहिरीतील हे पाणी पिण्यासाठी बंद करण्यात आले. वेताळवाडीतील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होऊ नये यासाठी ऐनघर ग्रामपंचायतीच्या मार्फत ग्रामसेवक गोविंद शिद यांनी वाडीतील नागरिकांसाठी तातडीने पिण्याच्या पाण्याचे रोज ७० जार पाठविण्याची व्यवस्था शुक्रवारपासून केली आहे. तसेच या प्रदूषित विहिरतील पाणी काढण्याचे काम ऐनघर ग्रामपंचायतीकडून शुक्रवारीच सुरू करण्यात आले होते मात्र पावसामुळे यात अडथळे येत असले तरी विहिरीतील संपूर्ण पाणी काढण्यात येईल असे ग्रामसेवक गोविंद शिद यांनी स्पष्ट केले. तसेच पाणीपुरवठा व विहीर स्वच्छता कामासाठी ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंच कलावती कोकळे, उपसरपंच भगवान शिद, ज्येष्ठ सदस्य व माजी उपसरपंच मनोहरभाई सुटे, सर्व सदस्यांचे व वेताळवाडी ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले आहे.
मात्र असे असले तरी या माथेफिरू तरुणाला जास्तीत जास्त शासन व्हावे अशी मागणी वाडीतील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *