आंबेनळी घाटरस्ता बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवली; घाटरस्त्याच्या रुंदीकरणाआड ‘केमिकल वेस्ट’ गाडण्याचा संशय

Poladpur police
पोलादपूर (शैलेश पालकर) : 
आंबेनळी घाट रस्त्यावर ११ जुलै २०२५ पासून लागू केलेली वाहतूक बंदी १५ जुलैपासून पुढे १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही बंदी केवळ अवजड वाहनांसाठी असून, एलएमव्ही (हलकी वाहने), कार आणि तत्सम वाहनांना मर्यादित अटींसह घाटातून वाहतूक करण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, घाटाच्या दरडप्रवण भागात मोठ्या प्रमाणावर डोंगर उत्खनन, भराव टाकण्याची कामे सुरू असून, या रस्त्याच्या दुरुस्तीसोबतच घाट पूर्णपणे बंद करण्याच्या हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
या रस्त्याचे रुंदीकरण महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत हाती घेण्यात आले असून पोलादपूर ते सुरूर दरम्यान २४.२०० कि.मी.चा रस्ता सुधारण्यात येणार आहे. मात्र, घाटातील दरडप्रवण भागांमध्ये ‘हेजार्डस केमिकल वेस्ट’ गुपचूपपणे गाडण्यात येत असल्याच्या कुजबुजेसोबत भराव टाकण्याच्या नावाखाली गंभीर पर्यावरणीय धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे स्थानिक गावांमध्ये नाराजी असून, प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट भूमिका आजपर्यंत घेण्यात आलेली नाही.
१५ जुलै रोजी पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे घाटातील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे जिल्हाधिकारी रायगड यांनी नव्याने अधिसूचना काढून घाटातील वाहतुकीस अंशतः परवानगी दिली. सध्या घाटात पोलिस बंदोबस्त असून, अवजड वाहनांसाठी घाट बंद ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान, घाट बंद ठेवण्यामागे केवळ सुरक्षा नव्हे तर अन्य ‘बनावट कारणे’ असल्याचा संशय नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *