अलिबाग येथील भर समुद्रात साखर गावातील राकेश मारूती गण यांच्या मालकीच्या मच्छीमार बोटीला भीषण आग लागली. या आगीत बोट 80 टक्के जळून खाक झाली असून, अंदाजे दोन कोटींचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, बोटीवरील 18 खलाशी सुखरूप बचावले आहेत. आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.
गेल्या तीन दिवसांत रायगड जिल्ह्यातील तीन बोटी आगीच्या घटना घडल्याने बोट मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी करंजा येथे डागडुजीसाठी उभ्या असलेल्या मच्छीमार बोटीला आग लागली होती. तसेच, डिसेंबर 2023 मध्ये मांडवा बंदरात एका स्पीड बोटीला आग लागून दोन जण जखमी झाले होते.
स्थानिकांच्या मदतीने अलिबाग समुद्रातील जळालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे काम सुरू आहे. कोस्ट गार्ड आणि नेव्हीच्या मदतीने बोटीवरील सर्व खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. रायगड जिल्ह्यातील सततच्या बोट आगीच्या घटनांमुळे समुद्रात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.