अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा; वेश्वीतील प्रभाकर पाटील कनिष्ठ महाविद्यालयाला राज्यस्तरीय ‘A+’ श्रेणी

अलिबाग | अमुलकुमार जैन
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय राज्यातील ४२९ निवडक शाळांपैकी एक बनत थेट ‘A+’ (अ+) श्रेणी मिळवण्यात यशस्वी झाले आहे. ही अत्यंत प्रतिष्ठेची मान्यता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद द्वारे राबविलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) प्रक्रियेतून प्राप्त झाली आहे.
राज्यातील १,०२,६७५ शाळांनी सन २०२४–२५ मध्ये स्वयं-मूल्यांकन पूर्ण केले. त्यापैकी उच्च गुण मिळवणाऱ्या १०,७२१ शाळांना २०२५–२६ मध्ये बाह्य मूल्यांकनासाठी निवडण्यात आले, आणि १०,६४४ शाळांचे प्रत्यक्ष पडताळणीद्वारे मूल्यांकन पूर्ण झाले. या निकोप प्रक्रियेत अलिबागच्या प्रभाकर पाटील कनिष्ठ महाविद्यालयाने उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता, सुविधा आणि व्यवस्थापनाचे जोरदार प्रदर्शन करत सर्वोच्च श्रेणी मिळवली.
या यशामुळे अलिबागच्या शैक्षणिक क्षेत्राचा अभिमान वाढला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष मा. आ. जयंत पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, खजिनदार नृपाल पाटील यांनी प्राचार्य रविंद्र पाटील, संचालक विक्रांत वार्डे, उपप्राचार्य निशिकांत कोळसे आणि सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
SCERT च्या प्रशासकीय प्रतिनिधींच्या मते, राज्यातील शाळांची गुणवत्ता जागतिक दर्जाची व्हावी, यासाठी SQAAF आराखडा तयार करण्यात आला आहे. या पारदर्शक प्रक्रियेमुळे शाळांना आपले उणिवा दूर करून प्रगती करण्याची संधी मिळते.
अलिबागमधील या महाविद्यालयाच्या यशामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे. या प्रतिष्ठित मानांकनामुळे महाविद्यालयाचे स्थान राज्यातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये अधिक दृढ झाले असून, भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श उदाहरण ठरणार आहे. ग्रामीण भागात गुणवत्ता शिक्षणाची नवीन उंची गाठणाऱ्या या महाविद्यालयाने अलिबागला खरोखरच शैक्षणिक क्षेत्रातील एक गौरवशाली ठसा दिला आहे.