पोलादपूर नगरपंचायतीच्या भंगार विक्रीला जनरल बॉडीची प्रतिक्षा

पोलादपूर | शैलेश पालकर
नगरपंचायत पोलादपूरच्या सत्तासुंदरीच्या चंचलपणामुळे सत्ताधारी शिवसेनेसोबत कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक घायाळ झालेले दिसून येत आहेत. नगरपंचायतीच्या भंगारविक्रीची प्रक्रिया विविध विषय समित्यांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले विरोधी पक्षाचे नगरसेवक भंगारविक्रीच्या प्रश्नावर आक्रमक झाले असून मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे आक्षेप दिल्यामुळे भंगार विक्रीला आता जनरल बॉडीच्या बैठकीची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पोलादपुर नगरपंचायत अंतर्गत दि. 8 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरपंचायतीकडील निरुपयोगी साहित्याचा लिलाव करणे बाबत ठराव करण्यात आला होता. ग्रामपंचायत पोलादपूरच्या काळातील जुना ट्रॅक्टर भंगारात परस्पर विक्री करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसल्याने विरोधीगटनेते दिलीप भागवत आणि नगरसेवक स्वप्नील भुवड यांनी, ट्रॅक्टर भंगारात देण्याबाबत कोणताही स्वतंत्र व स्पष्ट ठराव सर्वसाधारण सभेमध्ये झालेला नाही. म्हणून, कोणताही अधिकृत ठराव, पारदर्शक लिलाव प्रक्रिया व प्रशासकीय मान्यता नसताना ट्रॅक्टर भंगार स्वरूपात विक्री करणे ही प्रक्रिया नियमबाह्य व अमान्य असल्याचे नमूद करून ठामपणे विरोध दर्शविला.
यामुळे आगामी जनरल बॉडीच्या मिटींगमध्ये या भंगारविक्रीच्या प्रक्रियेबाबत मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी चर्चा घडवून आणण्याची भूमिका घेत स्थगिती दिली आहे. या भंगारविक्रीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने तीन भंगारखरेदी करणाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून त्यामध्ये सर्वाधिक 75 हजार रूपयांची खरेदीक्षमता एका भंगारविक्रेत्याने दर्शविली आहे. या भंगारात समाविष्ठ ग्रामपंचायत पोलादपूरचा ट्रॅक्टर गंजलेल्या व नादुरूस्त अवस्थेत असल्याने तसेच आरसी बुक नसल्याने भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या ट्रॅक्टरची किंमत आरटीओद्वारे निश्चित करण्यात आली असून सदरची रक्कम आरटीओ पेणकडे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने नगरपंचायत पोलादपूरला वर्ग होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.
सद्यस्थितीत, सर्व भंगार नगरपंचायत पोलादपूरच्या दर्शनी भागात काढून ठेवण्यात आला असून त्यामुळे नगरपंचायतीची शोभा वाढली आहे. नागरिकांमध्ये या भंगारविक्रीबाबत अनेक प्रकारच्या हवाडण्या व  अफवा पसरल्या असून सत्तेत बसलेल्या विरोधकांबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त होताना सत्तासुंदरीदेखील चंचलतापूर्ण वर्तन करीत असल्याचे बोलले जात आहे.
दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी शिवसेना विरूध्द काँग्रेस अशी लढत होऊन भाजपच्या अंकिता निकम जांभळेकर यादेखील निवडून आल्या. मागीलवेळी अंकिता निकम यांना शिवसेनेने सत्तेत सहभागी करून सभापती पद दिले तर काँग्रेसतर्फे निखिल कापडेकर हेदेखील शिवसेनेसोबत सभापती झाले आहेत. काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यावेळी कापडेकर यांनी शिवसेनेसोबत सत्तेत संधी साधली. कापडेकर यांच्याविरूध्द पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा उगारण्याऐवजी उरलेल्या शिवसेना उबाठा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. गेल्या आठवडयामध्ये झालेल्या विविध विषय समितीच्या निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना शिवसेनेच्या सत्तासुंदरीने आपलेसे केले आणि रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपविरोधात संघर्ष करावा लागल्याने भाजपच्या नगरसेविका अंकिता निकम यांना कोणत्याही विषय समितीत सदस्य म्हणूनही संधी डावलली गेली. आता सत्तेतील विविध विषय समित्यांमध्ये सदस्य म्हणून सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भंगारविक्रीसंदर्भात ठामपणे आक्षेप घेत विरोधीपक्ष म्हणून अस्तित्व टिकविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.