अमरावतीतील राज्यस्तरीय खुल्या योगासन स्पर्धेत रानवडी येथील ओंकार उतेकर यांना रौप्य पदक

Onkar Utekar
पोलादपूर (शैलेश पालकर) :
अमरावती जिल्हयातील टाकरखेडा मोरे येथील मानवसेवा विकास फाउंडेशन आयोजित  पाचव्या राष्ट्रीय योग व निसर्गोपचार संमेलन अंतर्गत प्रथम राज्यस्तरीय खुली योगासन स्पर्धा सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी संत गुलाबबाबा आश्रम येथे पार पडली. अकोला, अमरावती, जालना, बीड, लातूर, बुलढाणा, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे या जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठया संख्येने स्पर्धेत सहभाग घेतला असता रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर तालुक्यातील रानवडी येथील ओंकार उतेकर यांनी रौप्य पदक प्राप्त केले.
या स्पर्धेत अमरावतीतील रणजित देशमुख यांना सुवर्ण पदक तर पुण्यातील शिरूर येथील योगेश भालेराव यांना कांस्य पदक प्राप्त झाले. महिला गटामध्ये किर्ती देशमुख यांना सुवर्ण, मालती लामखडे यांना रौप्य तर  स्नेहा शेळके यांना कांस्यपदक प्रदान करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याचे ओंकार उतेकर यांनी 28 ते 35 वयोगटामध्ये रौप्य पदक पटकावले. हलासन, विरासन, शिर्शासन, बकासन, पार्श्वकोनासन या आसनांचे उत्कृष्ट सादरीकरण ओंकार उतेकर यांनी केले. या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजक मानवसेवा विकास फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर पाटील आणि माजी आमदार रमेश बुंदिले यांच्याहस्ते पदक आणि प्रमाणपत्र विजेत्या खेळाडूंना प्रदान करण्यात आले.
या भव्य सोहळयाला माजी आमदार रमेश बुंदिले, माजी नगराध्यक्ष ऍड. कमलकांत लाडोळे, भाजपा शहराध्यक्ष उमेश भोंडे, ज्ञानपीठ स्कूलचे अध्यक्ष शंकर गावंडे, संगई कन्या शाळेचे मुख्याध्यापक उत्तम मुरकुटे, पत्रकार गजानन चांदुरकर आणि स्पर्धेचे मुख्य परीक्षक ऍड. आनंद जगदेव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी योगासनांचे महत्त्व आणि त्याचा आरोग्यावर होणारा सकारात्मक प्रभाव यावर प्रकाश टाकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *