आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता भारताच्या कृषी निर्यातीवर उमटू लागले आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीऐ) बंदरातून होणारी फळे व भाजीपाल्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली असून तब्बल १४८ कंटेनर मागील चार दिवसांपासून बंदरातच अडकून पडले आहेत. आखाती देशांमधील बाजारपेठा बंद असल्याने निर्यातदार आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतातून होणाऱ्या कृषीमालाच्या निर्यातीपैकी सुमारे ८० टक्के माल आखाती देशांमध्ये पाठवला जातो, तर उर्वरित २० टक्के माल युरोपात निर्यात केला जातो. दुबई आणि कुवेत यांसारख्या देशांमध्ये भारतीय फळे व भाजीपाल्याला मोठी मागणी असते. मात्र सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे त्या देशांतील व्यापाऱ्यांनी नवीन ऑर्डर देणे थांबवले आहे. परिणामी भारतीय मालाची निर्यात अचानक बंद झाली असून बंदरात मोठ्या प्रमाणावर कृषीमालाचा साठा अडकून पडला आहे.
या कंटेनरमध्ये प्रामुख्याने फळे आणि भाजीपाला असून दीर्घकाळ बंदरातच राहिल्यास हा माल सडून खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्यातदारांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा सर्वाधिक फटका कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत बोलताना या परिस्थितीची दखल घेतली असून देशाकडे सध्या सुमारे दोन महिन्यांचा तेलसाठा उपलब्ध असल्याने इंधन दरवाढीची तातडीची भीती नसल्याचे स्पष्ट केले. तसेच शेतमाल निर्यातीच्या प्रश्नावर आवश्यक त्या पातळीवर हस्तक्षेप करण्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.