शिर्डीत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसांच्या पक्ष अधिवेशनात अजित पवारांनी पक्ष शिस्तीवर भर देत महत्त्वाचे वक्तव्य केले. “पक्षात राहून चुकीचं काम करणाऱ्यांची हकालपट्टी होणार, मागे-पुढे पाहिलं जाणार नाही,” असा सज्जड दम पवारांनी दिला. तसेच, पक्षात सामील होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, मात्र सरसकट सर्वांना पक्षात घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाचा अभिमान टिकवून बेरजेचा विचार
“पक्षात सामील होण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींविषयी बेरजेचा विचार करावा लागणार आहे. मात्र, ज्यांची जनमानसात प्रतिमा मलिन आहे त्यांना पक्षात घेणार नाही,” असे अजित पवार म्हणाले. पक्षाची प्रतिमा मलिन होईल असे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
कार्यकर्त्यांना संघटनात्मक आदेश
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी तयारी सुरू करण्याचे आदेश देताना त्यांनी सांगितले की, “प्रत्येक पदाधिकाऱ्याने 25 घरांवर लक्ष केंद्रित करावे आणि महापालिकांच्या प्रभागांनुसार कामाला लागावे.” तसेच, दर मंगळवारी मंत्र्यांची आणि आमदारांची बैठक होईल आणि महिन्यातून एकदा जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सूचित केले.
पक्षातील शिस्त मोडणाऱ्यांसाठी स्पष्ट इशारा
धनंजय मुंडे आणि छगन भुजबळांवर सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, अजित पवारांनी स्पष्ट इशारा दिला की, “पक्ष शिस्त मोडणाऱ्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. त्यांची हकालपट्टी अटळ आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे संकेत देत पवारांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकट करण्यावर भर दिला.