रोहा : दिवसेंदिवस जास्तच कुंडलिका नदी प्रदूषित होत चालली आहे. नदी पात्रात सडलेली मच्छी, मेलेल्या कोंबड्यांचा खच पडला असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांकडून सातत्याने जनजागृती, पाठपुरावा केला जात आहे. मात्र ढिम्म प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची पाऊले उचलली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे रोहेकरांनो आता सावधान, अशीच म्हणायची वेळ स्थानिकांवर आलेली आहे.
कुंडलिका नदीच्या संवर्धनाचे काम दोन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. यावर तब्बल ३० कोटींहून अधिक रुपये खर्चदेखील करण्यात आले. मात्र कुंडलिका नदीच्या नदी पात्राचे संवर्धन न करता फक्त किनाऱ्याचे सुशोभीकरण करून पैसे हडप करण्यात आले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शहरातील नाले, सांडपाण्याचे पाणी थेट नदी पात्रात सोडले जात असून बाजूलाच बाजारपेठ असल्याने मांसाहारी कचरा संपूर्ण नदी पात्रात टाकला जात आहे.
नागरिकांची सह्यांची मोहीम
दूषित पाणी नाल्याद्वारे थेट नदीत सोडण्यात येत असल्याने रोहा शहरातून बारमाही वाहणारी कुंडलिका प्रदूषित झाली आहे. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधी पसरली आहे. त्यात आता सडलेली मच्छी, मटण व कोंबड्यांची भर पडल्याने प्रदूषण आणखी वाढले आहे. प्रदूषण मंडळ आणि नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी रोह्यात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. कुंडलिका नदी बचाव समितीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप वडके यांनीही शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. तरीही अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
अस्तित्वच नष्ट होत चालले
काही वर्षांपूर्वी रोहा शहराला या नदीतून पाणीपुरवठा केला जात होता. आता तीच कुंडलिका नदी बेवारस होऊ लागली आहे. या नदीची हेळसांड होत असून नदीचे अस्तित्वच संपुष्टात येत चालले आहे.
—————————————
कुंडलिकेच्या प्रवाहात मच्छीमटण आणि कोंबड्यांचे टाकाऊ अवयव टाकले जात आहेत, त्यामुळे नदी शंभर टक्के प्रदूषित झाली आहे, नगर पालिकेला सह्यांचे पत्र देऊन सुध्दा दखल घेतली गेली नाही, आता कायदेशीर नोटीस दयावी लागेल, सह्यांची मोहीम आणखी तेज करणार असून रोहा नगर पालिकेचे कुकर्म घरोघरी पोहचवणार आहे.
…दिलीप वडके, ज्येष्ठ पत्रकार, संस्थापक, कुंडलिका नदी बचाव समिती
—————————————
नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे, मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही, हे रोहा अष्टमीकरांचे दुर्दैव आहे. रोहयाला कोण वाली नाही अशी परिस्थिती आहे, दुसरीकडे प्रदूषण मंडळ मूक गिळून गप्प बसले आहे.