
रायगड :
रायगड जिल्ह्यातील विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर काम करावे, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीला खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, माजी आमदार पंडित पाटील व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, ग्रामीण भागातील जलसंपत्ती समस्येवर उपाययोजना, जलजीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. श्रीमती बोर्डीकर यांनी मंत्रालयात यासंदर्भात विशेष बैठक घेण्याचे जाहीर केले. तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदे भरून आरोग्य सेवा १००% नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर द्यावा, असे आदेश दिले. वीज वितरणावरील तक्रारी तात्काळ सोडवाव्यात, भूमिगत वायरिंग पूर्ण झाल्यास ओव्हरहेड वायरिंग तात्काळ हटवावी, वारंवार ट्रान्सफॉर्मर बदलण्यामागील कारणांचा अभ्यास करून उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सेवा सप्ताहात चिन्हांकित धोकादायक क्षेत्रांवर तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जनतेचे प्रश्न गांभीर्याने व तत्परतेने सोडवण्याचे आवाहन करत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना जनहिताच्या योजनांचे प्रभावी अंमलबजावणीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी जिल्हा प्रशासन विकासकामांसाठी कटीबद्ध असून सर्व योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले.
Related