तालुक्यातील दिव येथे लक्ष्मी दत्ताराम पाटील यांच्या राहत्या घराला आग लागून संसाराची राख रांगोळी झाली. या आगीत रोख रक्कम व साहित्यासह एकूण १ लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पेण तालुक्यातील दिव येथील लक्ष्मी दत्ताराम पाटील यांच्या घराला रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी रात्रौ ११: २० वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक घराला आग लागली. या आगीचा भडका पाहून ग्रामस्थांनी आग विझण्यासाठी धाव घेतली.
यावेळी पेण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. काही तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत लक्ष्मी दत्ताराम पाटील यांच्या घरातील रोख रक्कम ५० हजार व संगणक, फर्निचर,शिलाई मशीन, कपडे, गॅस सिलेंडर, पाईप, पंखा कुलर असे साहित्य मिळून एकूण १ लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामा संबंधित तलाठी यांनी केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.