
नागोठणे ( महेंद्र माने ) :
रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर मोठ्या प्रमाणात शेवाळ पसरल्याने त्यावरून प्रवासी घसरून पडणे नित्याचेच झाले आहे. मंगळवार 23 जुलै रोजी सकाळच्या गाडीच्या वेळी एक तरुण पडला असून त्याच्या हाताला मार लागल्याचे समजते. त्यामुळे हे रेल्वे स्थानक आहे की घसरगुंडी स्थानक असा प्रश्न प्रवासी वर्गाला पडला आहे. दरम्यान स्टेशनच्या शेडला मोठी गळती असल्याचे समजते.
येथील रेल्वे स्थानकामधील सर्वच फलाटावर दरवर्षी पावसाळ्यात शेवाळ येत असते. परंतु फलाट क्रं. एकवर शेवाळ मोठ्या प्रमाणात पसरली असून त्या शेवाळीवरून घसरून बरेच प्रवासी पडत आहेत. हे नित्याचेच झाले असल्याने नेहमी प्रवास करणारे प्रवासी सावधपणे रेल्वेत चढतात. त्यांच्या पैकी कींवा नवीन प्रवासी शेवाळ वरुन घसरला तर इतर प्रवाशी त्यांना पकडत असल्याचे चित्र पावसाळी नेहमीच दिसत असल्याने रेल्वे स्थानक आहे की घसरगुंडी स्थानक असा प्रश्न प्रवासी वर्गाला पडला आहे.
असाच प्रकार मंगळवार 23 जुलै रोजी सकाळी 6.50 ची रोहा दिवा गाडी पकडताना एक तरुण प्रवासी शेवाळी वरून घसरून फलाटावर पडला.व त्याच्या हाताला मार लागला आहे. जर का एखाद्या प्रवाशाला पडताना पकडले नाही तर तो सरळ रेल्वे रुळावर पडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हणणे नियमित प्रवास करणार्या प्रवाशांचे आहे. अशा प्रकारे अपघात झाल्यास प्रवाशाच्या जीवितास धोका पोहचू शकतो. त्याच बरोबर याच स्थानकात असलेल्या पत्र्याच्या शेडला मोठी गळती लागल्याने बाहेरच्या पावसापेक्षा येथिल गळतीतून होणार्या विसर्गाच्या फवार्याने प्रवाश्यांची अंगोळ होत असते. परिणामी ओले चिंब कपडे तसेच ठेऊन रेल्वे मध्ये प्रवास करावा लागत असल्याने या रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला सहन करावा लागत आहे.
अपघात होऊ नये यासाठी प्रशासनाने संपूर्ण फलाटावर पत्रे टाकणे व फलाटावरील अर्धवट आत असलेले पत्रे जरा पुढे टाकण्याची आवश्यकता आहे. ते जर शक्य नसेल तर फलाटावर आलेली शेवाळ नियमित साफ करणे गरजेचे असून या शेवाळी वरून घसरून मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारण्यात येत आहे.
——————————————–
आमच्याकडे दोन सफाई कामगार आहेत त्यांच्याकडून आम्ही रोज साफ सफाई करून घेतो. दोन दिवस खूप पाऊस असल्याने शेवाळी व्यवस्थित साफ झाली नाही.सदरील शेवाळी पावडर टाकून साफ करण्यात येईल.तरी प्रवाशांनी फलाटावर चालताना व गाडी पकडताना सावधतेने पकडावी.
…एल.एन.ठाकूर, नागोठणे स्टेशन मास्तर
Related