शेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी (JNPA) विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित वेतन, भत्ते व इतर हक्कांसाठी लढा देत असून, आता ११ ऑगस्ट २०२५ पासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहेत. रुस्तोमजी केरावाला फाउंडेशनच्या दुर्लक्षित धोरणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जुलै २०१९ पासूनचा महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढ, सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी, भविष्य निर्वाह निधी भरणा यासह अनेक मागण्या अद्याप कागदावरच आहेत.
कर्मचाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, सात वर्षांची थकीत रक्कम फरकासह त्यांच्या खात्यात जमा होईपर्यंत उपोषण सुरू राहील. शासनाच्या २३ नोव्हेंबर २०२२ च्या निर्णयानुसार शाळेचे हस्तांतरण होऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नसल्याचा आरोप आहे. या संदर्भात त्यांनी आमदार, कामगार नेते, पालक संघटना, शिक्षक संघटना यांना निवेदने दिली असून, त्वरित तोडगा निघावा अशी मागणी केली आहे.
प्रमुख मागण्यांमध्ये जुलै २०१९ पासूनची वेतनवाढ व भत्ता, जून २०१९ चा PF भरणा, शिक्षक-कर्मचारी कायमस्वरूपी करणे, इयत्ता ८वी-१०वीसाठी शासन अनुदान स्वीकारणे, PAP फी सवलत वाढवणे, वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी लाभ, १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करणे आणि पाचवा-सहावा वेतन आयोगाच्या थकबाकीची तात्काळ अदा यांचा समावेश आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.