DNA काढणारे आज गळ्यात गळे; रायगडच्या मतदारांना राजकारण्यांचा नवा ‘युतीधर्म’!

रायगडच्या मतदारांना राजकारण्यांचा नवा 'युतीधर्म'!
PEN न्यूज ऑनलाइन टीम |
कालपर्यंत एकमेकांवर भ्रष्टाचार, स्वार्थी राजकारण आणि सत्तेच्या गैरवापराचे गंभीर आरोप करणारे नेते आज एकाच मंचावर हसतमुखाने गळाभेट घेताना दिसत आहेत. आमदार महेंद्र थोरवे आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या व्हायरल फोटोमुळे रायगडच्या राजकारणात सोयीच्या मैत्रीचा आणि मतदारांच्या भावनांशी खेळ केल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
कोकण विभागातील विधान परिषद निवडणुकीसाठी अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात महेंद्र थोरवे, सुनिल तटकरे, मंत्री उदय सामंत आणि मंत्री नितेश राणे एकाच मंचावर एकत्र दिसले. मात्र, काही महिन्यांपूर्वीपर्यंत एकमेकांचा राजकीय ‘डीएनए’ काढण्याच्या भाषा करणारे आणि सभांमधून जहरी टीका करणारे नेते अचानक गळाभेट घेत असल्याने मतदारांमध्ये आश्चर्य आणि संतापाची भावना व्यक्त होत आहे. कालचे आरोप खरे होते की आजची मैत्री खरी, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
या राजकीय संघर्षात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, सोशल मीडियावर एकमेकांविरोधात प्रचार केला आणि पक्षनिष्ठा जपण्यासाठी संघर्ष केला. मात्र नेत्यांच्या एका फोटोने कार्यकर्त्यांच्या त्यागावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अनेक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून काही ठिकाणी राजीनामा सत्र सुरू झाल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. नेत्यांचे राजकीय गणित जुळले की कार्यकर्त्यांच्या भावना दुय्यम ठरतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रायगडच्या राजकारणात बदलती समीकरणे नवी नसली तरी सार्वजनिक पातळीवर कट्टर विरोधक असलेले नेते अचानक एकत्र येणे ही मतदारांसाठी संभ्रमाची बाब ठरत आहे. विचारसरणी, भूमिका आणि तत्त्वांपेक्षा सत्तेची समीकरणे महत्त्वाची ठरत असल्याचे चित्र या गळाभेटीतून समोर आले आहे. त्यामुळे रायगडमध्ये आता एकच चर्चा रंगली आहे. राजकारण हे विचारांचे राहिले आहे की केवळ सत्तेसाठीचा व्यवहार बनले आहे?