तालुक्यातील 25-30 टक्के मतदार ग्रामीण भागात विखुरलेले असताना सुमारे 70 टक्के चाकरमान्यांना गावाकडे दुबार मतदार म्हणून आणण्याचा खर्च कोटयवधी रूपये होत असल्याने जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना कोटी रूपयांपेक्षा अधिक खर्च सोसावा लागूनही मतांची खात्री नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे बाहेरून येणाऱ्या मतदारांना ने-आण, जेवण-खाणं व आमिष स्वरूपातील खर्च जिल्हा परिषदेच्या उमेदवारांसह पंचायत समितीच्या उमेदवारांनाही सोसावा लागत आहे. परिणामी, यंदा रायगड जिल्हा परिषदेच्या 2 गटांतील सह उमेदवारांपैकी तुल्यबळ लढतीतील चार उमेदवारांना तसेच थेट लढत असलेल्या पोलादपूरच्या पंचायत समितीच्या 4 गणांतील 8 उमेदवारांना आर्थिक खर्चाची तरतूद मोठी करावी लागली आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार 55.73 टक्के मतदान झाले असून शेवटच्या दोन तासांत ही आकडेवारी फारशी वाढल्याचे दिसून आले नाही.
कापडे बुद्रुक गटातील उमेदवार अजय सलागरे यांनी कापडे बुद्रुक शाळेमध्ये सपत्नीक मतदान केले. निलेश कुंभार यांनी वाकण शाळेमध्ये मतदान केले तर लोहारे गटातील उमेदवार चंद्रकांत कळंबे यांनी उमरठ तर कृष्णा कदम यांनी ओंबळीतील प्राथमिक शाळेमध्ये मतदान केले. कापडे बुद्रुक जि.प.गटामध्ये माटवण पं.स.गणांतर्गत गोवेले, उमरठ, धारवली, कालवली, मोरसडे, बोरघर, आडावळे बुद्रुक, बोरावळे, माटवण, देवळे, वाकण, कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, चांभारगणी बुद्रुक आणि बोरज या मतदान केंद्रातील मतदार साक्षी कांबळेकर विरूध्द हर्षदा वरवाटकर यांच्यासह अजय सलागरे विरूध्द निलेश कुंभार यांचे भवितव्य ठरविणार आहेत.
तर कापडे बुद्रुक पं.स.गणामध्ये देवळे, करंजे, दाभिळ, लहुळसे, दाभिळ, लहुळसे, केवनाळे, वाकण-1, वाकण-2, नानेघोळ, कापडे खुर्द, कापडे बुद्रुक 1, कापडे बुद्रुक 2, कापडे बुद्रुक 3, रानकडसरी, रानबाजिरे, चांभारगणी बुद्रुक, निवे, किनेश्वर, साखर या मतदान केंद्रातील मतदारांनी जिल्हा परिषद गटातील उमेदवार अजय सलागरे विरूध्द निलेश कुंभार यांच्यासह कापडे बुद्रुक गणातील अनिल दळवी विरूध्द अनिल मालुसरे यांच्या भवितव्यासाठी केलेल्या मतदान सोमवारी मतमोजणीवेळी स्पष्ट होणार आहे.
लोहारे जि.प.गटांतर्गत कोतवाल बुद्रुक पं.स.गटांतर्गत काटेतळी, सडवली, चोळई, कोंढवी, महालगूर, ओंबळी, कोतवाल खुर्द, परसुले, कोतवाल बुद्रुक, कोतवाल बुद्रुक 2, पैठण, भोगाव खुर्द, महाळुंगे, मोरगिरी, फौजदारवाडी, धामणदिवी, देवपूर, पळचिल आणि गोळेगणी या मतदान केंद्रातील मतदारांनी जिल्हा परिषदेच्या कृष्णा कदम (कमळ), अ.रझाक करबेलकर (हात), चंद्रकांत कळंबे (शिवसेना), कृष्णा कदम (ढोबळी मिरची) या चार उमेदवारांसह पोलादपूर पंचायत समितीच्या कोतवाल गणातील सुरेंद्र चव्हाण आणि अविनाश शिंदे यांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद केले आहे.
लोहारे जि.प.गटांतर्गत जिल्हा परिषदेच्या कृष्णा कदम (कमळ), अ.रझाक करबेलकर (हात), चंद्रकांत कळंबे (शिवसेना), कृष्णा कदम (ढोबळी मिरची) या चार उमेदवारांसह पंचायत समितीच्या लोहारे पं.स.गणामध्ये देखील युगज्ञा दीपक उतेकर विरूध्द अनिता अनिल भिलारे यांच्यासाठी सवाद, सवाद-2, कणगुले, पार्ले, लोहारे-1, लोहारे-2, चरई, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खुर्द, तुर्भे खोंडा, वझरवाडी, दिविल येथील मतदारांनी मतदान केले.
पोलादपूर तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिघाबाहेर अनेक अलिशान लक्झरी, बसेस, मोटारकार, जीप तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या छोटया आरामगाडयांची गर्दी दिसून आली. सुमारे 70 टक्के मतदार पोलादपूरबाहेरील असल्याने त्यांच्यावरील खर्चाचा आकडा सर्वसामान्य उमेदवारांना परवडण्यासारखा नसल्याने यापुढे ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी होणारा खर्च टाळण्यासाठी बाहेरील मतदारांना पोस्टल मते देण्याचा किंवा आधारकार्डाशी त्यांचे मतदार ओळखपत्र जोडून एकाचठिकाणी मतदान करण्याचा पर्याय ठेवण्याची गरज आहे.
पोलादपूर तालुक्यात मुंबईतील मतदार उमेदवारी करण्यासाठी येतात, ग्रामीण भागातील मतदार असलेले राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पोलादपूर नगरपंचायतीसाठी उमेदवार होत आहेत. पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच पोलादपूर शहरात असलेल्या काही मतदारांना मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकांमध्ये उमेदवारी मिळाल्याने ते तिकडे अलिकडेच नगरसेवकही झाले आहेत. पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठीही गेल्या निवडणुकीपासून मुंबईतील मतदारालाच संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. यामुळे भारतीय निवडणूक आयोगाने तसेच महाराष्ट्र निवडणूक आयोगाने आधारकार्डाशी मतदार ओळखपत्र जोडण्याची सक्ती केल्यास मतदारांचे कोणकोणत्या ठिकाणी मतदान आहे, हे समजून आल्यास त्याला योग्य वाटेल त्या ठिकाणी मतदानाची तसेच उमेदवारीची संधी मिळू शकणार आहे. दुपारी साडेतीन वाजे पर्यंत 11 हजार 163 पुरूष 10 हजार 705 महिला अशा 21 हजार 868 मतदारांनी मतदानात सहभाग दर्शविला