चिखलात दगड मारणे म्हणजे स्वतःवरच चिखल उडवून घेणे’ – रामदास कदमांच्या आरोपांना सुनील तटकरेंचे सडेतोड प्रत्युत्तर

रायगड | अमुलकुमार जैन
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्ट आणि ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. अलिबागमधील राजकीय नेत्यांबाबत केलेल्या वक्तव्यांवर बोलताना तटकरेंनी संयम राखत, मात्र सूचक शब्दांत कदमांवर टीका केली.
सुनील तटकरे म्हणाले, “अलिबागच्या दोन नेत्यांबाबत माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोललेले बरे नाही. दगड चिखलात मारणे, हे रामदास कदम यांचे जे गलिच्छ वक्तव्य आहे, त्यावर मी अधिक बोलू इच्छित नाही. कारण चिखलात दगड मारणे म्हणजे तो चिखल आपल्याच अंगावर उडवून घेण्यासारखे असते.” पक्षांतर्गत निर्णयांबाबत बोलताना तटकरेंनी स्पष्ट भूमिका मांडली. “आमच्या पक्षाचा निर्णय घेणे हा आमचा अधिकार आहे. कोण कुठे गेला, कुणाची साथ धरली, त्यांनी मातोश्री का शोधली, हे त्यांचे वैयक्तिक प्रश्न आहेत. आम्ही कधीही त्यांना याबाबत जाब विचारलेला नाही,” असे ते म्हणाले. या वक्तव्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे रामदास कदम यांच्या राजकीय भूमिकेवर बोट ठेवले.
दिवंगत काँग्रेस नेते बॅरिस्टर अंतुले यांच्याविषयी बोलताना तटकरेंनी आपली भूमिका ठामपणे मांडली. “अंतुले साहेबांचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले आहेत. त्यांच्या विरोधात कधीही अपशब्द माझ्याकडून आले नाहीत आणि भविष्यातही येणार नाहीत,” असे सांगत त्यांनी आपली राजकीय परंपरा आणि संस्कार अधोरेखित केले.
तटकरेंच्या या प्रतिक्रियेमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. संयमित पण धारदार शब्दांत दिलेले हे प्रत्युत्तर आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे.
दरम्यान, तटकरेंच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्षनेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत होत आहे. रायगडच्या राजकारणात हे प्रत्युत्तर आगामी काळात कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.