अलिबाग तालुक्यातील वढाव बुद्रुक परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली असून काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. बुद्धेश कमलाकर नाईक (वय २०), रा. फणसापूर आदिवासी वाडी, पो. बापळे, ता. अलिबाग (सध्या रा. अनिल राऊत यांची वीटभट्टी, बामणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत कमलाकर वसंत नाईक (वय ४७) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात खबर दिली होती. त्यांचा मुलगा बुद्धेश हा दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ पासून बेपत्ता होता. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग रजिस्टर क्रमांक ०१/२०२६ नुसार नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस व नातेवाईकांकडून बामणगाव व परिसरातील जंगल भागात शोधमोहीम सुरू होती.
शुक्रवार, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३५ वाजण्याच्या सुमारास मौजे वढाव बुद्रुक, पो. बामणगाव, ता. अलिबाग येथील स्मशानभूमीजवळ रांजणीच्या झाडाला कमरेच्या कापडी पट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत बुद्धेशचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक तपासात मयत तरुणास मानसिक आजार असल्याचे समोर आले असून त्याच कारणामुळे त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी इनक्वेस्ट अधिकारी पोलीस नाईक गांगुर्डे यांनी पंचनामा केला. पुढील तपास पोलीस हवालदार मनीष ठाकूर , महेंद्र राठोड(बंड्या)यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.