ध्येय-वेड्या जेष्ठांची आंतरराष्ट्रीय ५० दिवसांची सायकल सफर यशस्वी, मायदेशी जल्लोषात स्वागत

PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
आशियातील “SENIOR CYCLO आंतरराष्ट्रीय सायकलिंग मोहीम २०२५/२६” यशस्वीरीत्या पूर्ण करत सहा भारतीय ज्येष्ठ सायकलस्वारांनी चिकाटी, जिद्द आणि शारीरिक तंदुरुस्तीचा अद्वितीय आदर्श घालून दिला आहे. तब्बल ३७०० किलोमीटरचा स्व-समर्थित (Self-Supported) प्रवास पूर्ण करून हा संघ गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी सुखरूप मायदेशी परतला. विमानतळावर त्यांच्या नातेवाइकांनी आणि मित्रपरिवाराने जल्लोषात स्वागत करत या यशाचा आनंद साजरा केला.
ही मोहीम ३ डिसेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडली. एकूण ५० सायकलिंग दिवसांमध्ये या ज्येष्ठ सायकलस्वारांनी थायलंड, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम या चार देशांतून प्रवास केला. विविध हवामान परिस्थिती, अनोळखी रस्ते, भाषेची अडचण आणि शारीरिक थकवा यांवर मात करत त्यांनी हा खडतर प्रवास पूर्ण केला.
या पराक्रमात सहभागी असलेले ज्येष्ठ सायकलस्वार पुढीलप्रमाणे –
  • रमाकांत महाडिक (७२ वर्षे)
  • संजय कट्टी (६८ वर्षे)
  • धनंजय मदन (६६ वर्षे)
  • संजय कुमठेकर (६१ वर्षे)
  • राजू पाटील (५९ वर्षे)
  • मोनिष चक्रवर्ती (५४ वर्षे)
विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रवास स्व-समर्थित होता. प्रत्येकाने स्वतःचे साहित्य, उपकरणे आणि आवश्यक वस्तू स्वतः बाळगत नियोजनपूर्वक मार्गक्रमण केले. वयाच्या उत्तरार्धातही त्यांनी दाखवलेली ऊर्जा आणि मानसिक ताकद ही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
या मोहिमेद्वारे त्यांनी ‘वय हे केवळ आकड्यांमध्ये असते; जिद्द आणि इच्छाशक्तीच खरी ताकद असते’ हा संदेश दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत त्यांनी सायकलिंग क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे.
मायदेशी परतल्यानंतर विमानतळावर झालेल्या उत्स्फूर्त स्वागतावेळी कुटुंबीयांच्या डोळ्यांत अभिमान आणि आनंद अश्रू दाटून आले होते. या ज्येष्ठ सायकलवीरांच्या धाडसी प्रवासामुळे देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.