अलिबाग मच्छिमार सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचा एकतर्फी विजय

७७ वर्षांनी अलिबाग मच्छीमार सोसायटीत प्रथमच निवडणूक; जय मल्हार अलिबाग कोळी समाज विकास आघाडीचा तेरा पैकी तेरा जागांवर विजय
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 

रायगड जिल्ह्यातील पहिली मच्छीमार संस्था असलेल्या अलिबाग मच्छीमार सोसायटीच्या स्थापनेनंतर ७७ वर्षांनी प्रथमच निवडणूक झाली असून, जय मल्हार अलिबाग कोळी समाज विकास आघाडीने सर्व तेरा पैकी तेरा जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे.
८५४ सभासदांपैकी ५९४ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ६९.५५% मतदान झाले. या निवडणुकीसाठी दोन मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. सर्वाधिक मते सुकुमार नारायण भगत (३९४) यांनी तर सर्वात कमी मते सिद्धेश काशीनाथ झिटे (३१०) यांनी मिळवली.
ही सोसायटी १९४९ साली माजी आमदार ना. का. भगत यांनी दिल्ली येथे नोंदवून आणलेली असून, स्थापना झाल्यापासून आजपर्यंत निवडणूक बिनविरोध पार पडत होती. मात्र २०२५ मध्ये प्रथमच निवडणूक झाली असल्याने अलिबाग व कोकणातील मच्छीमार बांधवांचे याकडे विशेष लक्ष होते.
निवडणूक प्रशासक व निवडणूक अधिकारी निलेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच अलिबाग पोलिस निरीक्षक किशोर साळे व पीएसआय भुंडेरे यांच्या पथकाच्या बंदोबस्तात शांततेत पार पडली.
===========================
आम्ही या सोसायटीमध्ये आजपर्यंत केलेल्या कामाची पोच पावती म्हणून संस्थेच्या सर्व सभासदांनी आजच्या निवडणुकीत आमचे पॅनल मधील सर्व उमेदवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने आमचा विजय झाला आहे.तसेच विरोधक आघाडीत असलेले उमेदवार यांनी सुद्धा कोणताही वाद होऊ न देता निवडणूक पार पाडून एक आदर्श समोर ठेवला आहे त्याबद्दल त्याचेदेखील आम्ही आभारी आहोत.-
…सुकुमार भगत, विजयी उमेदवार (जय मल्हार अलिबाग कोळी समाज विकास आघाडी)
===========================
अलिबाग मच्छिमार सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ही ७७वर्षांनी प्रथमच घेण्यात आली. ही निवडणूक विजयी झालेले उमेदवार आणि आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. सभासदांनी आमच्यावर जो विश्वास दाखविला आहे त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. विजयी उमेदवार हे आगामी काळात संस्थेचा कार्यभार योग्य रीतीने पार पाडतील अशी आशा व्यक्त करीत त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी आमच्या आघाडीकडून शुभेच्छा देत आहोत.
…जयेंद्र पेरेकर, अलिबाग कोळीवाडा समाज परिवर्तन आघाडी
विजयी उमेदवार (संक्षेप) :
  • सुकुमार नारायण भगत – ३९४
  • जितेंद्र दत्तू बंद्री – ३९१
  • विजय बबन भगत – ३८३
  • शंकर गणपत भगत – ३७७
  • प्रकाश मारुती पोरे – ३५५
  • जनार्दन रामदास भगत – ३४०
  • गणेश केसरीनाथ नाखवा – ३३८
  • सिद्धेश काशीनाथ झिटे – ३१०
  • अक्षय चंद्रकांत भगत – ३८८
  • नागेश राजाराम पोतदार – ३५०
  • शैला शेषनाथ भगत – ३४९
  • गीतांजली निलेश आग्रावकर – ३७९
  • मनिषा प्रवीण भगत – ३७३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *