२८ वर्षांचे स्वप्न साकार… पण नावावरून नाराजीचा वाद उफाळला! नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते

Navi mumbai airport opening
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ चे भव्य उद्घाटन आज संपन्न झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच अनेक केंद्रीय आणि राज्यस्तरीय मान्यवर उपस्थित होते.
गेल्या २८ वर्षांपासूनचे स्वप्न अखेर साकार झाले असून या विमानतळामुळे मुंबई आणि उपनगरांतील हवाई प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे. या विमानतळावरून प्रत्यक्ष विमान वाहतूक नोव्हेंबरच्या मध्यात सुरू होणार आहे. पुढील पाच ते सात वर्षांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महामुंबईचे प्रमुख केंद्र बनेल, आणि सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ दुय्यम ठरेल, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे.
सध्या देशात सर्वाधिक उड्डाणे होणारे विमानतळ म्हणजे दिल्ली, तर मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. परंतु नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर हे चित्र लक्षणीय बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईच्या वाढत्या विस्तारासोबत दुसरी मुंबई म्हणून नवी मुंबईकडे पाहिले गेले. आराखड्यांपासून ते परवानग्या, पर्यावरणीय आणि प्रशासनिक अडथळे पार करत हा प्रकल्प अखेर साकार झाला आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईचा जागतिक दर्जाचा विकास निश्चित झाला आहे.
मात्र या उत्साहात एक नाराजीचा सूर मात्र ठळकपणे उमटला. स्थानिक नागरिकांनी दीर्घकाळ “दी. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नाव देण्याची मागणी केली होती. पण उद्घाटन सोहळ्यात ही मागणी पूर्ण न झाल्याने स्थानिक नागरिक आणि आंदोलक गटांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांना अपेक्षा होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी स्थानिकांच्या मागणीला न्याय देतील, पण तसं न घडल्याने ‘उद्घाटनाचा आनंद आणि नावाचा वाद’ एकाच वेळी अनुभवायला मिळाला.
एकीकडे प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा अभिमान, तर दुसरीकडे स्थानिकांच्या भावना दुर्लक्षित झाल्याची वेदना — या दोन टोकांमध्ये नवी मुंबई विमानतळाचा आजचा सोहळा अडकून राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *