उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीस अजून तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी असतानाही राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांसाठी संपर्क प्रमुखांची घोषणा केली आहे. यामुळे भविष्यात गरज पडल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केल्याचे मानले जात आहे.
मुंबई आणि ठाणे मतदारसंघांची जबाबदारी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सध्या भाजपकडे असलेल्या मतदारसंघांमध्येही संपर्क प्रमुख नेमण्यात आले आहेत. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपकडून सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधानसभेत झालेल्या चर्चेनंतरही मतभेद स्पष्ट झाल्याचे चित्र दिसले.
दरम्यान, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी वैयक्तिक संबंध चांगले असले तरी राज्यातील भाजप नेत्यांकडून सातत्याने दबाव वाढत असल्याचे शिंदे गटाचे मत आहे.
भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी शिंदे यांनी राज्यभर संघटनात्मक चाचपणी सुरू केली असून २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.