११ वर्षांनंतर पुन्हा सावित्री पुलाला धोका? बाजूला उगवलेल्या वटवृक्षांमुळे दुर्घटनेची भीती; जबाबदार कोण – एल अँड टी की राष्ट्रीय महामार्ग विभाग?

महाड | मिलिंद माने 
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर ११ वर्षांपूर्वी. सावित्री नदीच्या पुलावर दुर्घटना घडली होती त्याच घटनेची पुनरावृत्ती बाजूला वाढलेल्या वृक्षांमुळे पुलाच्या भागाला धोका उत्पन्न होण्याची वाट या महामार्गाची देखभाल दुरुस्ती करणारे एल अँड टी कंपनी बघत आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी झोपी गेलेले आहेत का? असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील महाड जवळील सावित्री पुलावर मध्यरात्री बाराच्या सुमारास २ ऑगस्ट २०१६ रोजी रात्री देवगड मुंबई व राजापूर बोरिवली या एस टी महामंडळाच्या रत्नागिरी वरून मुंबईला जाणाऱ्या दोन बस सावित्री नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली त्यात ४० जणांना जलसमाधी मिळाली होती. 
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदी वरील पुलाच्या या घटनेला आज ११ वर्षे झाली घटना घडल्यानंतर वर्षभराच्या आत या ठिकाणी नवीन पूल बांधून वाहतुकीस खुला करण्यात आला मात्र आता या पुलाच्या ११ वर्ष बांधणी नंतर याच पुलाच्या मुंबई कडून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या डाव्या बाजूला भले मोठे पिंपळाचे वटवृक्ष व इतर वृक्ष उगवले आहेत या पुलावरून लाखोंच्या संख्येने प्रवासी रात्री अपरात्री प्रवास करत असतात या उगवलेल्या झाडांमुळे या पुलाला तडे जाऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
११ वर्षांपूर्वी देखील जुन्या पुलावर मोठ्या प्रमाणावर अशाच पद्धतीने झाडे उगवल्याने पूल कमकुवत होऊन ही दुर्घटना घडली होती त्याची पुनरावृत्ती पुन्हा घडू नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाने गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचे आहे. नाहीतर पुन्हा दुर्घटना घडून अनेकाना प्राण गमवावे लागणार असल्याचे चित्र या पुलाच्या भिंतीला उगवलेल्या वृक्षांकडे बघून दिसत आहे. वास्तविकता या फुलाची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम एल अँड टी कंपनीकडे आहे मात्र कंपनीचे लक्ष ना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची लक्ष परिणामी भविष्यात जर सावित्री दुर्घटनेच्या घटने सारखी पुन्हा एकदा या पुलावरून घटना घडल्यास या दुर्घटनेला राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार राहील का असा सवाल या महामार्गावरून प्रवास करणारे लाखो प्रवासी व स्थानिक ग्रामस्थ विचारीत आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील या रस्त्याचे काम ज्या एल अँड टी कंपनीने केले त्याच कंपनीकडे पुलाच्या देखभाल दुरुस्ती कडे लाखो रुपये कंपनीला अदा केले जातात मात्र या कडे बघून कशा पद्धतीची देखभाल केली जाते या वर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.