रायगड भुषण पुरस्कार प्राप्त तसेच संपुर्ण रायगड जिल्ह्यात ज्यांचा वारकरी सांप्रदाय वाढविण्यासाठी अतिशय मोलाचा वाटा होता असे धाटाव ( रोहा) मुळ गाव डोलवी येथिल ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील ( बापु) यांचे शनि.दि.४ जाने.रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन होऊन ते वैकुंठात विलिन झाले. बापुंच्या निधनाची बातमी संपूर्ण रायगड जिल्ह्यात पसरताच बापुंच्या दर्शनासाठी धाटाव या निवासस्थानी अफाट जनसमुदाय लोटला. महत्वाचे म्हणजे नागोठणेजवळील बाळसई येथिल काल शुक्र.दि.३ रोजी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने बापुंची शेवटची किर्तनसेवा ठरली. ही झालेली शेवटची किर्तनसेवा म्हणजे बाळसई करांचे भाग्यच समजावे लागेल. बापुंच्या या अशा अचानक जाण्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायामध्ये मोठा आघात झाला आहे.
रोहा तालुक्यातील नावाजलेल्या अशा बाळसई येथिल अखंड हरिनाम सप्ताहास प्रधम सुरूवात झाली म्हणजेच जवळपास ३९ वर्षांपासून पुरुषोत्तम पाटील महाराज यांची बाळसई गावांमध्ये किर्तनाची सेवा ही अद्यापपर्यंत अविरत सुरू होती. बाळसई गावावर बांपुचे अपार प्रेम होते. यावर्षीच्या देखिल बाळसई येथिल अखंड हरिनाम सप्ताहास दि. १ जाने रोजी सुरुवात झाली होती. या चार दिवसांच्या सप्ताहामध्ये सालाबादप्रमाणे तिस-या दिवसांची दि.३ रोजी किर्तनाची सेवा ही बापुंची होती. बापुंनी यावर्षी देखिल आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा थकवा किंवा कोणत्याही प्रकारच दुखणं न दाखवता त्याच जोमाने किर्तन करीत समस्त बाळसईकरांची व नागोठणे विभागातील भाविकांची सर्वांचीच मने त्यांनी जिंकली.
परंतु बाळसई गावातील बापुंचे हे शेवटचे किर्तन असेल असे कोणालाही स्वप्नात वाटत नसतांनाच बापुंवर शनि दि.४ रोजी पहाटे काळाने घाला घातला. बाळसई येथिल बापुंचे किर्तन झाल्यानंतर ते रात्री १२.३० वा.धाटाव येथे आपल्या घरी गेल्यानंतर झोपी गेले. सकाळी बापु उठत नाहीत म्हणुन त्यांच्या घरातील त्यांना उठवण्यासाठी गेले पंरतु त्यांच्या शरीराकडुन काहीच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांना रोहा येथिल डॉ . अशोक जाधव यांच्या दवाखान्यात घेऊन जाण्यात आले. परंतु तो पर्यंत वेळ निघून गेली होती तिथे पोहण्याआधीच बापुंनी अखेरचा श्वास घेतला होता.
दरम्यान बापुंच्या निधनाची बातमी बाळसई ग्रामस्थांना समजताच त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचा पालखी सोहोळा रद्द करुन बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी धाटाव या ठिकाणी जाऊन बापुंचे सुआश्रु नयनांनी शेवटचे दर्शन घेतले. बापुंच्या अशा या अचानक जाण्याने वारकरी सांप्रदायाचा आधारवड हरपळ्यामुळे संपूर्ण रायगडमधिल वारकरी संप्रदायामध्ये शोकाकुल वातावरणात पसरले आहे.