
पेण :
हिंदवी नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २२ सप्टेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष रवींद्रनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी संस्थेचे सचिव अनंत सावंत, संचालक धनाजी घरत, तुकाराम म्हात्रे, सचिन बांदिवडेकर, शंकर कांबळे यांच्यासह जीवन पाटील, मुन्ना अखवारे, सतीश पाटील, महेश म्हात्रे, आनंदी म्हात्रे, नरेश म्हात्रे आणि कविता जंगम आदी सभासद उपस्थित होते.
सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी मातांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. दीपप्रज्वलनानंतर उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प व पेन भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त सहाय्यक अभियंता जीवन शंकर पाटील यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, पेण एज्युकेशन सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या धनाजी घरत यांचाही शाल, गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जीवन पाटील यांनी पतसंस्थेसाठी गणपती बाप्पाची मूर्ती भेट म्हणून दिली. वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन, आर्थिक ताळेबंद, नफा-तोटा पत्रक वाचून मंजूर करण्यात आले. शासकीय तपासणी अहवालाचे वाचन तसेच वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. अंतर्गत हिशेब तपासणीसाठी ऑडिटर नेमणूक व आयत्या वेळच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभासदांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तरे दिली गेली.
सतीश पाटील यांनी या सभेचे सूत्रसंचालन केले. सभा यशस्वी करण्यासाठी सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
