
बिहार : सध्या सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीचा मार्ग अवलंबून कल्पनेपलीकडील शक्कल लढवून बक्कळ पैसे कमविण्याचा गोरख धंदा करत असल्याचे दिसून येते.
असाच एक प्रकार बिहार राज्यात घडला आहे. तिथे तरुण मुलांना टारगेट करण्यासाठी स्त्रीला गर्भवती करण्याची विचित्र ऑनलाइन ऑफर देण्यात आली होती. स्त्रीला मूल झालं तर 13 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळतील, असं आमिष दाखवून मुलांना फसवलं जात होतं. पोलिसांनी या सायबर रॅकेटचा पर्दाफाश करून आठ जणांना अटक केली.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सायबर गुन्हेगारांच्या टोळीच्या म्होरक्याचं नाव मुन्ना कुमार असं आहे. तो सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. ही टोळी तरुणांना महिलांशी संबंध ठेवण्याचं आणि 13 लाख रुपयांच्या बक्षिसाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत होती.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सायबर गुन्हेगार मुलांना 799 रुपये भरून रजिस्ट्रेशन करायला लावत होते. यानंतर ते मुलांच्या मोबाइलवर काही महिलांचे फोटो पाठवत आणि त्यातून एकीची निवड करण्यास सांगत. मुलाने एखाद्या महिलेचा फोटो निवडताच त्याच्याकडे सिक्युरिटी डिपॉझिटची मागणी केली जात होती.
सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम 5 ते 20 हजार रुपयांच्या दरम्यान होती. ही रक्कम संबंधित मुलाने निवडलेल्या स्त्रीच्या सौंदर्यावर अवलंबून होती. एखाद्या मुलाने पैसे ट्रान्स्फर केले की हे गुन्हेगार त्या मुलाशी संपर्क बंद करत होते. हा सगळा प्रकार फक्त फोनच्या माध्यमातून सुरू होता.
जास्तीत जास्त मुलं आपल्या जाळ्यात अडकावीत यासाठी हे गुन्हेगार मुलांना आणखी एक ऑफर देत होते. एखाद्या महिलेने बाळाला जन्म दिला नाही, तरी संबंधित मुलाला 5 लाख रुपये मिळतील, अशी ही ऑफर होती. पोलिसांनी असे मेसेज आणि स्कीम्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या या फ्रॉड रॅकेटच्या म्होरक्याचा शोध सुरू आहे.
सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दैनंदिन आयुष्यातल्या बहुतांश गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे मोबाइल फोनच्या वापरामध्येही वाढ झाली आहे. आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाइल फोन आहे. हीच बाब गुन्हेगारांच्या पथ्यावर पडली आहे.
Related