सुकेळी परिसरात गावठी भाज्यांची आवक वाढली !

Sukelee Gavathi Bhajyaa

सुकेळी ( दिनेश ठमके ) :

 सुकेळी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकांची वस्ती आहे. दररोज अतिशय मेहनत करुन व प्रामाणिकपणे आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत. सद्यस्थितीत गावठी भाज्यांमुळे येथिल आदिवासी नागरीकांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळत असल्याने या भागातील आदिवासी नागरीकांच्या विशेषतः महिला वर्गांच्या चेह-यावर एक आनंद दिसुन येत आहे.
पावसाळा सुरु झाल्यापासून जंगली भागात मिळणाऱ्या रानटी भाज्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात विक्रिस येत होत्या. परंतु श्रावण महिन्यात पिकविल्या जाणा-या गावठी भाज्या तयार होऊन त्या विक्रिसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. सुकेळी परिसरातील आदिवासी लोकांनी देखिल दोन ते तीन महिने मेहनत घेऊन गावठी भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत, त्या भाज्या विक्रिसाठी नागोठणे, कोलाड, खांब तसेच गावोगावी घेऊन जात आहेत. तर काही महिला या मुंबई -गोवा महामार्गालगत सुकेळी या ठिकाणी भाजी विक्रीसाठी बसत आहेत.
 सुकेळी या ठिकाणी महामार्गावरुन प्रवास करणारे अनेक प्रवासी या ठिकाणी नाष्ट्यासाठी किंवा जेवणासाठी थांबत असतात त्यामुळे या ठिकाणी ताजी गावठी भाजीच्या विक्रीसाठी बसलेल्या महिलांकडून हे प्रवासी मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
या गावठी भाज्यांमध्ये काकडी, वांगी, मिरची, भेंडी, शिराळा, घोसाळे, कारळे, दुधी, भोपळा, माठ, अळुची पाने आदि भाज्यांचा समावेश आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे या भाज्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे आदिवासी लोकांना देखिल चांगला रोजगार मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *