सुंदरराव मोरे महाविद्यालयाचा रौप्य महोत्सवी सांगता; समारंभाप्रसंगी महायुतीचे नेते खा.तटकरे,आ.दरेकर व आ.गोगावले यांची उपस्थिती

Sunil Bharat Pravin
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार, दि. 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर यांनी दिली आहे.
रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे उदघाटन विधानपरिषद सदस्य आ.प्रवीण दरेकर यांच्याहस्ते होणार असून खा. सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला महाड  विधानसभा मतदार संघाचे आ. भरत गोगावले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास मंत्री व महाविद्यालयाचे संस्थापक कै प्रभाकर मोरे यांनी दि. 21 सप्टेंबर 1998 रोजी स्थापन केलेल्या या महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये महाविद्यालयाने रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळा, ओपन जिम व फिटनेस पार्क यांसारखे विविध उपक्रम आणि सुविधा विद्यार्थ्यांसाठी राबविल्या असून रौप्यमहोत्सवी वर्षातच शिवाई शिक्षण संस्थेने एमएससी ऑॅरगॅनिक केमिस्ट्री हा कोर्स देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. रौप्य महोत्सवी वर्षातच महाविद्यालयाने प्रथमच ऑॅनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करून विविध क्षेत्रातील गुणवत्तेच्या आधारावर मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय हा पुरस्कार देखील प्राप्त केला आहे. नॅक संस्थेच्या तृतीय अधिस्वीकृतीसह आयएसओ मानांकन प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभा समवेत शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
शिवाई शिक्षण संस्थेचे विश्वस्त,महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व माजी राजिप सदस्य अमित प्रभाकर मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी परिसरातील पालक वर्ग आणि नागरिक बंधू-भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर व उपप्राचार्य प्रा. सुनील बलखंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *