कुर्डुस गावातील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, सहस्रपैलू कबड्डीपटू आणि सामाजिक कार्यकर्ते विकास पांडुरंग थळे यांचे 8 ऑक्टोबर 2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कुर्डुस पंचक्रोशीत शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
विकास थळे हे यंगस्टार कुर्डुस या प्रसिद्ध कबड्डी संघाचे अष्टपैलू खेळाडू होते. सुमारे चाळीस वर्षे त्यांनी कबड्डीच्या मैदानावर अधिराज्य गाजवले. रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत त्यांनी कबड्डी आणि खोखोमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय, क्रिकेट आणि अॅथलेटिक्समध्येही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले.
सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असायचे. त्यांच्या प्रेमळ आणि दयाळू स्वभावामुळे ते सर्वांचे लाडके होते. नात्यांमध्ये जिव्हाळा, समाजसेवा आणि परंपरांचे जतन ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यामुळेच त्यांना दादया या प्रेमळ नावाने ओळखले जायचे.
विकास थळे यांच्या निधनाने कुर्डुस परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे उत्तरकार्य रविवार, 20 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.