संतोष देशमुख हत्या प्रकरण: वादात अडकलेल्या धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा दिला राजीनामा

Dhananjay Munde
मुंबई :
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी अखेर त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सद्सद् विवेकबुद्धीला स्मरून आणि प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत भूमिका स्पष्ट करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रक जारी केलं. त्यात नमूद केलं की, “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, या प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू राहील.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याप्रकरणात ठाम भूमिका घेतली असून, “न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्याय प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप होणार नाही. गुन्हेगारीला आमचा पक्ष कधीही पाठिंबा देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्यानंतर पहिल्या प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “माझी प्रकृती मागील काही दिवसांपासून ठीक नसल्याने डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, सद्सद् विवेकबुद्धीला अनुसरून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.”
दरम्यान, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. न्यायालयीन चौकशी प्रस्तावित असल्याने पुढील निर्णय न्यायप्रक्रियेनुसार घेतला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *